डॉक्टर जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर झाले आहे. डॉ. नारळीकर हे ९४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. महाराष्ट्रातील नाशिक शहरात हे साहित्य संमेलन होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. नारळीकर यांच्या सोबतच रंगनाथ पाठारे, भारत सासणे यांसारख्या साहित्यिकांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. पण अखेर नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले असून अध्यक्षपदासाठीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. आता अध्यक्ष निवड ही परस्पर संमतीने आणि सन्मानजनक मार्गाने होते.
खगोलशास्त्रज्ञ असणारे डॉक्टर नारळीकर यांनी शैक्षणिक लिखाणा सोबतच इतरही साहित्य रचना केल्या आहेत. खगोलशास्त्रासंबंधीत पुस्तकांसोबतच विज्ञानकथा, बालकथा, काल्पनिक कथा अशा विविध प्रकारची पुस्तके डॉ.नारळीकरांनी लिहिली आहेत. आकाशाशी जडले नाते, नभात हसरे तारे, अभयारण्य, व्हायरस, उजव्या सोंडेचा गणपती, टाईम मशीनची किमया ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. डॉक्टर जयंत नारळीकर यांन पद्मविभूषण या भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.