बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चीनला त्यांच्या प्रदेशात म्हणजेच देशात विस्तार करण्याचे आमंत्रण दिले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी भारताच्या ईशान्येकडील सात राज्ये म्हणजेच seven sisters बद्दलही भाष्य करत या प्रदेशात बांगलादेश हा महासागराचा एकमेव रक्षक असल्याचा दावाही केला. यानंतर मोहम्मद युनूस यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, “बांगलादेशच्या तथाकथित अंतरिम सरकारच्या मोहम्मद युनूस यांनी ईशान्य भारतातील सात भगिनी राज्यांना भूवेष्टित म्हणून संबोधले आहे आणि बांगलादेशला सागरी प्रवेशाचे संरक्षक म्हणून स्थान दिले आहे, हे विधान आक्षेपार्ह आणि तीव्र निषेधार्ह आहे. ही टिप्पणी भारताच्या धोरणात्मक “चिकन नेक” कॉरिडॉरशी संबंधित सततच्या असुरक्षिततेच्या कथेवर प्रकाश टाकते,” असं म्हणून हिमंत बिस्वा सरमा यांनी युनूस यांच्या वक्तव्यातील गांभीर्य अधोरेखित केले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “ऐतिहासिकदृष्ट्या, भारतातील अंतर्गत घटकांनी देखील ईशान्येला मुख्य भूमीपासून भौतिकदृष्ट्या वेगळे करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग तोडण्याचा धोकादायक सल्ला दिला आहे. म्हणूनच, चिकन नेक कॉरिडॉरच्या खाली आणि आजूबाजूला अधिक मजबूत रेल्वे आणि रस्ते नेटवर्क विकसित करणे अत्यावश्यक आहे. याव्यतिरिक्त, चिकन नेकला प्रभावीपणे बायपास करून ईशान्येला मुख्य भूमी भारताशी जोडणारे पर्यायी रस्ते मार्ग शोधण्यास प्राधान्य दिले पाहिजे. जरी हे महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी आव्हाने निर्माण करू शकते, परंतु दृढनिश्चय आणि नाविन्यपूर्णतेने ते साध्य करता येते. मोहम्मद युनूस यांचे असे प्रक्षोभक विधान हलक्यात घेतले जाऊ नये, कारण ते सखोल धोरणात्मक विचार आणि दीर्घकालीन अजेंडा प्रतिबिंबित करतात,” असं हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
The statement made by Md Younis of Bangladesh so called interim Government referring to the seven sister states of Northeast India as landlocked and positioning Bangladesh as their guardian of ocean access, is offensive and strongly condemnable. This remark underscores the…
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) April 1, 2025
हे ही वाचा..
जाणून घ्या आपल्या घरातील तुळशीचे काय आहेत फायदे
जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात रात्रीपासून काय घडतंय ?
नव्या आर्थिक वर्षात व्यावसायिकांना कोणता दिलासा मिळाला
मोहम्मद युनूस हे चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चीनला बांगलादेशच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागात चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर युनुस यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ते चीनला त्यांच्या देशात आर्थिक तळ उभारण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. युनूस म्हणत आहेत की, “भारताची पूर्वेकडील सात राज्ये म्हणजेच ज्याला सात बहिणी (seven sisters) म्हणतात, ते जमिनीने वेढलेले आहेत. त्यांच्याकडे समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. या प्रदेशात आपणच महासागराचे एकमेव रक्षक आहोत. यामुळे मोठ्या शक्यता निर्माण होतात. येथे चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार असू शकतो.” दरम्यान, बांगलादेशच्या या हालचालींमुळे भारतासाठी तणाव निर्माण होणार आहे. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर प्रदेश भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत आणि या भागात चीनची कोणतीही उपस्थिती भारतासाठी धोका निर्माण करू शकते.