मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीबाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यायसाय करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच न्यायालयाच्या बाहेर टॅक्सी आणि खाजगी कारमध्ये बसून नोटरी करणे यावर देखील उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे.
कायद्यासंबंधित व्यवसाय रस्त्यावर चालवले जाऊ नयेत, असे निरीक्षण खंडपीठने सांगितले आहे. तसेच केंद्रीय कायदा विभागाने नोटरी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बाहेर खासगी वाहनांमध्ये काही वकील नोटरीचा व्यायसाय करतात. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने संबंधित वकिलाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली असता वकील शिवाजी धनागे यांच्या वतीने अॅड्. उदय वारूंजीकर यांनी नेमके प्रकरण काय ते न्यायालयासमोर विशद केले.
हे ही वाचा:
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
‘मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची गरज’
कवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात
उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात
करोनामुळे वकिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. काही वकिलांना कार्यालये सोडावी लागली. शिवाय न्यायालयातील वकिलांच्या दालनात किंवा न्यायालयाच्या विविधी कार्यालयांत न्यायालयीन कागदपत्रांच्या नोटरीचे काम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे धनागे हे आपल्या कर्मचारी वर्गासह न्यायालयाच्या आवारात वाहनामध्ये बसून नोटरीचे काम करत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर हा मुद्दा किंवा त्याबाबतचे निवेदन मुख्य न्यायमूर्तीपुढे मांडण्यात का आला नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. तसेच या प्रकरणी शिफारशी करणारा आदेश देण्याचे स्पष्ट केले.
रस्त्यावर अथवा वाहनात बसून कायदेविषयक कामे केल्यामुळे या व्यवसायाबाबतची प्रतिमा नागरिकांच्या नजरेत कमी होऊ शकते, अशी नाराजी खंडपीठाने व्यक्त केली आहे.