रेमडेसिव्हीरसाठी धावाधाव करू नका!

पाच विविध चाचण्यांच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की, रेमडेसिव्हीरमुळे मृ्त्यूचे प्रमाण कमी होत नाही तसेच रुग्णालयातील रुग्णाचा कालावधीही कमी होत नाही. शिवाय, रोगाचा फैलावाला लगाम घालणेही या इंजेक्शनमुळे शक्य होत नाही.

रेमडेसिव्हीरसाठी धावाधाव करू नका!

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लोकांचे जीव वाचविण्यासाठी रेमडेसिव्हीर या इंजेक्शनवरून बरीच चर्चा सुरू आहे. या इंजेक्शनचा काळाबाजारही त्यामुळे सुरू आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे किंवा लोकही मेडिकलच्या दुकानात हे इंजेक्शन्स विकत घेण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. ज्यांना ही इंजेक्शन्स मिळत नाहीत त्यांनी धरणे धरले आहे, आंदोलने करत आहेत. एकूणच रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन जीवनदायी म्हणून प्रत्येक करोना रुग्णाने घेतलेच पाहिजे, असा समज निर्माण झाला आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. जागतिक आरोग्य संघटनेने तर या औषधाच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या करोना रुग्णावर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हीर उपयुक्त आहे, याचा कोणताही पुरावा नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
या संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि करोनासंदर्भातील तांत्रिक विभागाच्या प्रमुख डॉ. मारिया केरखोव्ह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, या इंजेक्शनसंदर्भात घेतलेल्या पाच चाचण्यांतून हे स्पष्ट झाले आहे की, करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण या इंजेक्शनमुळे कमी होत नाही किंवा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना त्यातून फारसा दिलासा मिळत नाही.

स्वामीनाथन यांचे म्हणणे आहे की, उपलब्ध पुराव्यांनुसार पाच विविध चाचण्यांच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की, रेमडेसिव्हीरमुळे मृ्त्यूचे प्रमाण कमी होत नाही तसेच रुग्णालयातील रुग्णाचा कालावधीही कमी होत नाही. शिवाय, रोगाचा फैलाव होणार नाही, याची खात्रीही या इंजेक्शनमुळे देता येत नाही.

अर्थात, हे सांगताना स्वामीनाथन रेमडेसिव्हीरबद्दल थोडा दिलासाही देतात. त्या म्हणतात की, काही निरीक्षणांवरून हे स्पष्ट होते की, अल्पप्रमाणात हे इंजेक्शन्स फायदेशीर ठरू शकतात. पण हे फायदे खूपच अल्प आहेत. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणखी संशोधन करत आहे. काही आठवड्यांत त्याविषयी माहिती पुढे येईल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचेच कशाला, महाराष्ट्रातील टास्क फोर्सनेही करोनातून बचाव करण्यासाठी रेमडेसिव्हीर हेच एकमेव औषध नाही हे स्पष्ट केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत टास्क फोर्सने ऑक्सिजनचा पुरवठा, व्हिटॅमिन्स, रक्त पातळ करण्याची औषधे याच्या आधारे करोनाचे रुग्ण लवकर बरे होऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे. एकूणच प्रत्येक रुग्णासाठी रेमडेसिव्हीरशिवाय पर्याय नाही, असे नाही.

टास्क फोर्सचे म्हणणे आहे की, विषाणूंची वाढ आणि रुग्णालयातील कालावधी दोन दिवसांनी कमी करण्याची शक्यता रेमडेसिव्हीरमुळे वाढते. आजाराच्या दुसऱ्या अथवा नवव्या दिवशी हे इंजेक्शन उपयोगी असते त्यानंतर नाही. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी म्हटले आहे की, हे औषध मोठ्या प्रमाणावर उपचार म्हणून सुचविण्यात येत आहे. त्यामुळे या औषधाचा करोनातून जीव वाचविण्यासाठी उपयोग होतोच, असा समज लोकांमध्ये पसरलेला आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. राजहंस म्हणतात की, रेमडेसिव्हीर वापरण्यासाठी रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर दबाव आणता कामा नये.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

मेडिकलची परीक्षा पुढे ढकलली, काय आहेत नव्या तारखा?

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

एकूणच रेमडेसिव्हीरमुळे जी खळबळ उडाली आहे त्यातून लोकांनी थोडे शांत होऊन विचार करण्याची गरज आहे. या इंजेक्शनच्या उत्पादनात वाढ करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे पण ते औषध गरजवंतांना आवश्यक आहे. प्रत्येक करोना रुग्णाने हे इंजेक्शन घेतलेच पाहिजे असे नाही, हेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेवढी लोकांकडून मागणी वाढेल तेवढाच रेमडेसिव्हीरच्या काळाबाजारास प्रोत्साहन मिळेल. तेव्हा या इंजेक्शनसाठी विनाकारण धावपळ करण्यापेक्षा जिथे खरोखरच गरज असेल तिथेच हे इंजेक्शन वापरले जावे. लोकांनी त्यासाठी टोकाचा आग्रह धरू नये, एवढाच संदेश यातून मिळतो.

Exit mobile version