देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी केलेल्या देवी-देवतांबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्यांचा पाढा वाचला. अंधारे यांच्या जुन्या व्हीडिओंचा दाखला देत फडणवीस यांनी अंधारे कशाप्रकारे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना थोतांड मानतात. श्रीकृष्णाबद्दल त्यांनी अवमानजनक टिप्पणी केली होती, हे सगळे कसे काय खपवून घेतले जाते, असा सवाल विचारला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले होते की, तुम्ही माझ्याशी समोरासमोर चर्चा करा.
कुणी कुणाला आव्हान द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण हे आव्हान देताना आपली योग्यताही तपासून पाहणे आवश्यक असते. सशाने सिंहाला युद्धासाठी आव्हान दिले तर ससा हाच हास्यास्पद ठरतो.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे. सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत आणि विद्यमान सरकारच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे. विरोधी पक्षनेता म्हणून महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडण्यातही फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. एवढेच नव्हे तर राज्याबाहेरील राजकारणातही त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखविली आहे. वेगवेगळ्या राज्यांतील निवडणुकांत त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग पक्षासाठी करून दिलेला आहे. सुषमा अंधारे यांनी निदान आपली वाटचाल कशी झाली याची तरी एकवेळ उजळणी करायला हवी. त्या कुठल्या पक्षात होत्या, कुणाकुणावर त्यांनी टीका केली होती आणि त्याच लोकांसोबत नंतर काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या त्याच जुन्या व्हीडिओंमधून त्यांचे हे विचार लोकांना कळले आहेत. सुषमा अंधारे यांना याआधी कुणी ओळखतही नव्हते. केवळ उद्धव ठाकरे यांच्या गटात शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करता यावी म्हणून जणू त्यांची नियुक्ती झाली आणि त्या नावारूपाला आल्या.
संविधानिक पद कधी त्यांनी भूषविलेले नाही, कधी पक्षीय राजकारणात त्यांना मानाचे स्थान मिळालेले नाही, तरीही त्या जेव्हा फडणवीस यांना आव्हान देतात तेव्हा त्या चेष्टेचा विषय ठरतात. अर्थात, त्यांच्या या आव्हानाला देवेंद्र फडणवीस हे विचारत नाहीत. पण समोर बसलेले प्रेक्षक टाळ्या वाजवतात, मीडिया आपण जे बोलू ते दाखवते त्यामुळे आव्हानाची ही भाषा सूचते.
अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस हे ताकदवान नेते आहेत, असे स्वतः राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच जाहीररित्या सभागृहात सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक दिग्गज नेता जेव्हा फडणवीस यांच्या ताकदीचा उल्लेख करतो तेव्हा त्याच पक्षातून उसन्या घेण्यात आलेल्या सुषमा अंधारे फडणवीसांना आव्हान देतात तेव्हा त्याची गंमत वाटते. अर्थात, त्याकडे गांभीर्याने पाहायलाही नको. पण योग्यता दाखवून देण्याची मात्र गरज आहे. उद्धव ठाकरे गटाकडून ही योग्यता कदाचित अंधारे यांना दाखविली जाणार नाही. कारण त्यांना बोलघेवड्या नेत्यांची गरज होती, जी गरज अंधारे आपल्या भाषणातून भागवत आहेत. त्यामुळे अंधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कदाचित यापुढे आव्हान देतील तेव्हाही टाळ्या वाजविल्या जातील. त्यांचे कौतुक केले जाईल. मागे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात सक्षणा सलगर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यथेच्छ टीका केली होती तेव्हा अजित पवार यांनी तिला थांबवले होते. तिला तिची योग्यता दाखवून दिली होती. ते काम उद्धव ठाकरे गट करणार नाही.
सुषमा अंधारे या कधी एखाद्या विचारधारेशी बांधील राहिलेल्या नाहीत. त्यांनी राष्ट्रवादीत काम केले पण त्याआधी त्यांनी शरद पवारांवरही घणाघाती टीका केली. ती करण्याची त्यांची योग्यता होती का, पण त्यांच्या त्या टीकेनंतरही त्या राष्ट्रवादीत होत्या. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनाही फैलावर घेतले पण आज त्या त्यांच्याच पक्षात आहेत. तेव्हा अशी विस्कळीत कारकीर्द असलेल्या अंधारेंसारख्या नेत्या केवळ बोलघेवडेपणातून आव्हान तर देऊ शकतात पण प्रत्यक्षात त्या कुणासमोर येऊ शकत नाहीत.
मागे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. महाराष्ट्रातील प्रकल्प कसे गुजरातला चालले आहेत, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी समोरासमोर चर्चा करावी असे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे होते. आदित्य ठाकरे यांच्या या मागणीत आणि अंधारे यांच्या आव्हानात काडीमात्र फरक नाही.
एकनाथ शिंदे हे गेली अनेक वर्षे विविध पातळीवर राजकारणात वावरत आले आहेत. एक मोठा कालखंड त्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे. ठाण्यातील शिवसेनेचा गड त्यांनी अबाधित राखला आहे. आदित्य ठाकरे हे केवळ युवा नेते आहेत तेही ठाकरे कुटुंबातील आहेत म्हणून. निवडून आले तेही सुरक्षित मतदारसंघ बघून. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान देणे हेदेखील तेवढेच हास्यास्पद आहे, जेवढे अंधारे यांचे फडणवीसांना दिलेले आव्हान. एकवेळ उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना आव्हान दिले किंवा शिंदेंना आव्हान दिले तर मान्य करण्यासारखे आहे. पण अंधारे आणि आदित्य ठाकरे यांनी अशी आव्हाने देणे हे थट्टेचा विषय बनतात.
सुषमा अंधारे यांनी दिलेल्या आव्हानाची दखल फडणवीस यांनी घेतली नाही. अधिवेशनात त्यांच्या जुन्या वक्तव्यांचा उल्लेख करताना त्यांनी अंधारे यांच्या नावाचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे आपण एखाद्या मोठ्या नेत्याला आव्हान दिले म्हणून आपण मोठे ठरत नाही. ते आव्हान देण्यासाठी आधी आपल्याला तेवढी क्षमता कमवावी लागते, वजन तयार करावे लागते. नाहीतर लोक त्याकडे गंमत म्हणूनच बघतात. भलेही मीडियात त्याची चर्चा होत असली तरी तो फक्त एक मीडियासाठी टीआरपी मिळविणारा विषय, यापलिकडे काहीही नसते. अंधारे आणि आदित्य ठाकरे यांनी हे लक्षात ठेवले तरी पुरे.