भारतीय यंदा या गोळ्यांच्या तालावर ‘डोलो’ लागले!

भारतीय यंदा या गोळ्यांच्या तालावर ‘डोलो’ लागले!

गेल्या एका वर्षात डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही कोणती गोळी वापरली आहे? एकतर तुम्ही ‘क्रोसीन’ किंवा ‘डोलो 650’ घेतली असेल. सर्दी आणि तापाच्या वेळी घेतलेल्या पॅरासिटामोल या गोळ्यांच्या विक्रीत गेल्या दोन वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. हा आकडा किती मोठा आहे, हे समजल्यावर धक्का बसेल. या दोन वर्षाच्या कोरोना काळात भारतीयांनी नाश्ता म्हणून डोलो-650 गोळ्या खाल्या की काय, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
महामारीच्या काळात भारतीयांनी थोडे थोडके नाही, तर तब्बल ३५० करोड ‘डोलो 650’ गोळ्यांचे सेवन केले आहे. हा आकडा इतका गगनचुंबी आहे की, या ३५० करोड पॅरासिटामोल गोळ्या सरळ करुन एकत्र ठेवल्या गेल्या, तर त्याची उंची माऊंट एवरेस्टहून ६ हजार पटीने अधिक असेल आणि बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीपेक्षा ६३ हजार पट जास्त असेल.

संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये कोविडचा उद्रेक होण्यापूर्वी भारतात डोलो गोळीच्या ७५ दशलक्ष स्ट्रिप्स विकल्या गेल्या होत्या. नोव्हेंबर २०२१ पर्यंत, त्याची विक्री दुप्पट झाली म्हणजेच २१७ करोड स्ट्रिप्स विकल्या गेल्या. आणि महामारीच्या काळात डोलोच्या ३५० करोड गोळ्या विकल्या गेल्या. विशेष म्हणजे, डोलो 650 ही केवळ सर्वाधिक विकली जाणारी टॅबलेट नाही, तर गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या कीवर्ड पैकी एक आहे. डोलो 650 ची निर्मिती बंगळुरू येथील मायक्रो लॅब्स लिमिटेडद्वारे केली जाते.

डोलो इज द बेस्ट

पॅरासिटोमोल हे एक सामान्य औषध आहे. हे औषध १९६० मध्ये बाजारात आले. क्रोसिन, डोलो आणि कॅल्पोल हे तीन प्रसिद्ध ब्रँड आहेत, जे पॅरासिटोमोल म्हणून ओळखले जातात. भारतात डोकेदुखी, दातदुखी, कोविड ताप किंवा अंगदुखी आहे, प्रत्येक समस्येवर एकच उपचार आहे, डोलो. डोलोचे हे यश नवीन नाही. २०१० मध्ये, डोलो 650 ने सर्वाधिक व्यवस्थापित ब्रँड पुरस्कार जिंकला. यासोबतच या ब्रॅंडला आणखी अनेक सन्मान मिळाले आहेत. जानेवारी २०२० पासून पॅरासिटामोलची विक्री पाहता, डोलो 650 विक्रीच्या बाबतीत अव्वल आहे. विक्रीच्या बाबतीत कॅल्पोल आणि सुमो एल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतात पैसेसेटामोलचे ३७ ब्रँड आहेत, ज्यांची विक्री देशातील विविध प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे.

Exit mobile version