पेण येथील पाळीव श्वानाच्या श्वसननलिकेत काचेची गोटी अडकल्याचे प्रकरण समोर आले. श्वानाच्या श्वसननलिकेत अडकलेली गोटी यशस्वीपणे बाहेर काढण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे. पेण येथील एका सात महिन्याच्या पाळीव लॅब्रेडोर जातीच्या मादी श्वानाला उलट्या आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. दिवसेंदिवस हा त्रास वाढल्यामुळे या श्वानाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील परळ येथे असलेल्या सुयश पेट क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
क्लिनिकमध्ये श्वानाचा एक्स- रे काढला असता श्वसननलिकेमध्ये काचेची गोटी अडकल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. ही गोटी श्वानाच्या श्वसननलिकेमधून फुफ्फुसापर्यंत जाऊन पोहचली होती. डॉ. एस. डी. त्रिपाठी आणि डॉ. जी. एस. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोपोफॉल एन्थेसिया अंतर्गत ब्रँकोस्कोपी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी मोठ्या परिश्रमाने आणि काळजीपूर्वक श्वानाच्या श्वसननलिकेतील काचेची गोटी एंडोस्कोपिक बास्केटने बाहेर काढली. या शस्त्रक्रियेनंतर श्वानाची तब्येत बरी असल्याची माहिती क्लिनिकचे डॉ. गौरव खांडेकर यांनी दिली.
हे ही वाचा:
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची कशी पोहोचली इंग्लंडला?
महाराष्ट्र अंतिम फेरीत मुलांमध्ये दिल्लीशी तर मुलींमध्ये कोल्हापूरशी झुंजणार
मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात
श्वान मालकांनी आपल्या श्वानाकडे नेहमी लक्ष ठेवायला हवे. श्वानाच्या शरीरात आंब्याची कोय, हाड, चेंडू, काचेची गोटी अडकल्याच्या तक्रारी येत असतात. मात्र, श्वानाच्या श्वसननलिकेत वस्तू अडकल्याची ही दुर्मिळ घटना आहे, असे मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय पशुशैल्य चिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ. गजेंद्र खांडेकर यांनी सांगितले.