जम्मू- काश्मीर अधिवेशन: पाचव्या दिवशीही कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ

कलम ३७० विरोधात आणलेल्या ठरावाला भाजपाकडून सातत्याने विरोध

जम्मू- काश्मीर अधिवेशन: पाचव्या दिवशीही कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ

जम्मू- काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनातील गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नसून आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही अधिवेशन सुरू होताच कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झाला. जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा यासाठी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने मांडलेल्या ठरावाविरोधात भाजपच्या आमदारांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली होती. सभागृहात निदर्शने करणाऱ्या विरोधी बाकांवरील सदस्यांना बाहेर काढण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना दिल्याने विधानसभेत अक्षरशः गोंधळ निर्माण झाला होता.

शुक्रवारी सकाळीही अधिवेशनादरम्यान गोंधळ पाहायला मिळाला. इंजिनिअर रशीद यांचे भाऊ आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांना मार्शलने सभागृहाबाहेर काढले. कलम ३७० विरोधात आणलेल्या ठरावाला भाजप सभागृहात सतत विरोध करत आहे. आज गदारोळ सुरू झाल्यानंतर पीडीपीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अधिवेशन सुरू होताच भाजपा आमदारांनी उभे राहून पीडीपी आणि सभापतींच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यास सुरुवात केली. कलम ३७० बहाल करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदार आणि विरोधकांमध्ये विधानसभेत गदारोळ झाला. कलम ३७० च्या पुनर्स्थापनेशी संबंधित दोन प्रस्तावांवरून सभागृहात हा गोंधळ सुरू आहे.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “५ ऑगस्ट २०१९ रोजी जे घडले ते आम्ही स्वीकारत नाही. आमच्याशी यावर चर्चा करण्यात आली नव्हती. काही लोक म्हणत होते की आम्ही तो मुद्दा विसरलो आहोत. पण, आम्ही फसवणूक करणारे लोक नाही, फरक हा आहे की आम्हाला विधानसभेतून गोष्टी कशा आणायच्या हे माहित आहे. विधानसभेतून दबाव दिला जावा की केंद्र सरकारला आमच्याशी बोलणे भाग पडेल. आम्ही तो आवाज उठवला, आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेतला. आम्ही ते साध्य करू. निवडणुकीसाठी आम्ही आश्वासने देत नाही. आम्ही हवेत बोलत नाही, आम्ही दिलेली आश्वासने पाळतो,” असं ते म्हणाले.

जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. नॅशनल कॉन्फरन्सने विधानसभेत हा प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये जम्मू- काश्मीर सरकारने केंद्र सरकारला निवडून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, दुसरीकडे भाजपने त्याला विरोध केला होता. पण, गुरुवारी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) जम्मू- काश्मीर विधानसभेत कलम ३७० आणि कलम ३५ अ पुनर्स्थापित करण्याची मागणी करणारा आणखी एक ठराव मंजूर केला.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन ग्रामरक्षकांची हत्या

राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?

राज ठाकरेंनी काढला फतवा, तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो पाठीशी उभे राहा!

अमेरिकेत चाय-बिस्कुटांसह सोरोस तंत्राचाही पराभव…

दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्षनेते सुनील शर्मा बोलत होते तेव्हा बारामुल्लाचे खासदार इंजिनिअर रशीद यांचे भाऊ खुर्शीद अहमद कलम ३७० चे पोस्टर घेऊन आले आणि त्यांनी पोस्टर फिरवायला सुरुवात केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये बाचाबाची सुरू झाली. परिस्थिती अशी बनली की मार्शलना हस्तक्षेप करून गोंधळ घालणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला.

Exit mobile version