शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, यामुळेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात राज्याला अग्रेसर राखण्यासाठी नवनवीन कल्पनांना शासनाने नेहमीच पाठबळ दिले आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्याची जोडही आवश्यक असल्याने नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठी उंची गाठणे शक्य होईल आणि या कामी योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक करीत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एनसीपीए येथील टाटा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संभाजी थोरात आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा..
शिमल्यातील बेकायदेशीर मशिदीची चौकशी करा
सरकारी जमिनीवर बंगले, राजस्थानचा गुंड हजरतच्या घरावर बुलडोझर !
मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून चार कामगारांचा मृत्यू
सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या विकासासाठी सहकार्य करणार
महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर असून शिक्षण क्षेत्रातही आघाडी घेण्यासाठी शासनामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या माध्यमातून तीन जागतिक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आस्थेवाईकपणे सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले. आपल्या किसननगर येथील शाळेच्या आठवणी जागवून आपल्या प्रगतीमध्ये शिक्षक रघुनाथ परब यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इमारतींपेक्षा शिक्षकांवरून शाळेचे महत्त्व ठरते असे सांगून खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढण्यास शिकविणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
‘वाचाल तर वाचाल’ असे नेहमी म्हटले जाते. परंतु जो वाचायला शिकवतो तो समाज घडवतो, यामुळे चांगला समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शासनाने शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले असून देशाला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी अग्रेसर होण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती मंत्री केसरकर यांनी यावेळी दिली. शिक्षकांसाठी टप्पा अनुदान लागू करून त्यांना प्रवाहात आणण्यात आले आहे. डिसेंबर ऐवजी जून महिन्यापासून हा टप्पा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरतीला सुरूवात करून पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ग्रंथपाल, शिक्षण सेवक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून त्यांना यापुढे निवडणूक आणि जनगणनेव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.