पंतप्रधान मोदींकडून ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

तरुणांची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे ही सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचा पुनरुच्चार

पंतप्रधान मोदींकडून ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, २३ डिसेंबर रोजी ७१ हजाराहून अधिक नियुक्ती पत्रांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाटप केले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून गेल्या १० वर्षांपासून सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू आहे. याचं अंतर्गत कुवैत दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान मोदींनी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. भारतातील तरुणांची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी नवीन भरती झालेल्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, “रविवारी रात्री उशिरा कुवेतहून परत आलो. तिथे भारतीय तरुण आणि व्यावसायिकांशी भेट घेतली. त्यानंतर आता इथे आल्यावर माझा पहिला कार्यक्रम देशातील तरुणांसोबत आयोजित केला जात आहे. हा अतिशय आनंददायी योगायोग आहे. देशातील हजारो तरुणांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. तुमचे वर्षानुवर्षे असलेले जुने स्वप्न पूर्ण झाले आहे, मेहनतीला यश आले आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारतातील तरुणांची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे ही सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या दिशेने सातत्याने काम करत आहोत. गेल्या १० वर्षांपासून सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू आहे. आजही ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. गेल्या दीड वर्षात सरकारने सुमारे १० लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारच्या काळात भारत सरकारमध्ये तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. परंतु, आज देशातील लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्याच मिळत नसून या नोकऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने दिल्या जात आहेत. या पारदर्शी परंपरेतून येणारे तरुणही पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे देशसेवा करत आहेत याचा मला आनंद आहे, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा: 

ट्रम्प टीममधील AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागारपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन कोण आहेत?

मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी

पोलिसांशी झालेल्या चकमकीत खलिस्तान कमांडो फोर्स संघटनेचे तीन दहशतवादी ठार

पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडले; मद्यधुंद चालकाला केली अटक

कोणत्याही देशाचा विकास हा तरुणांच्या बळावर आणि नेतृत्वामुळे होतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. सर्वांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याची शपथ घेतली आहे. या प्रतिज्ञावर आमचा विश्वास आहे कारण भारतातील प्रत्येक धोरण आणि निर्णयाच्या केंद्रस्थानी देशातील प्रतिभावान तरुण आहेत. मेक इन भारत, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, डिजिटल इंडिया या प्रत्येक कार्यक्रमाची रचना तरुणांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version