जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या परिसराचा वापर ‘महाराणी’ या वेबसिरीजच्या शूटिंगसाठी केल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी नाराजी व्यक्त केली. ही बाब लाजिरवाणी असल्याची टीका त्यांनी केली आहे. मात्र, त्यावर चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही प्रतिवाद केला आहे. एखाद्या सिनेमाचे, नाटकाचे चित्रीकरण लोकशाहीला अपमानास्पद कसे मानले जाऊ शकते? चित्रपटाच्या सेटमध्ये सहभागी प्रत्येकजण सन्मानाने काम करण्याचा अधिकार असलेला एक नागरिक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, चित्रीकरणाची ठिकाणांसाठी भारताची जी प्रतिष्ठा आहे, त्यावर अशा अनिष्ट वृत्तीचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
‘लोकशाहीच्या जननीचा खरा चेहरा. जिथे जम्मू आणि काश्मीरमधील एकेकाळी सर्व पक्ष, धर्म, सर्व प्रकारची पार्श्वभूमी असलेले, लोकांनी निवडून आलेले प्रतिनिधी खूप महत्त्वाच्या बाबींवर कायदे करत होते, त्याचा वापर आता अभिनेते आणि अन्य कलाकार टीव्हीसाठी करत आहेत,’ असे अब्दुल्ला ‘एक्स’वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले होते. जिथे एकेकाळी ते बसायचे आणि सरकार चालवायचे, राज्याशी संबंधित दैनंदिन कामे करायचे, त्या जम्मू आणि काश्मीरच्या लोकशाहीच्या प्रतिकाचे मूल्य भाजपच्या सत्ताधारी सरकारने कमी केले आहे, अशी टीकाही केली होती. तसेच, जे पद सहा वर्षे भूषवण्याचा मला मान मिळाला, तिथे आता खोटा मुख्यमंत्री बसला आहे. ही किती लाजिरवाणी बाब आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
अब्दुल्ला यांच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना, हंसल मेहता यांनी जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांबद्दल आदर व्यक्त केला परंतु त्यांच्या टिप्पण्यांचे वर्णन “अवमानजनक आणि प्रतिगामी असल्याची टीका केली. ‘ही बाब लाजिरवाणी कशी ठरू शकते? एखाद्या नाटकाचे चित्रिकरण करणे हे लोकशाहीचा किंवा ‘लोकशाहीच्या जननी’चा अपमान करणारे कसे ठरू शकते? चित्रपटाच्या सेटवरील कलाकार, पडद्यामागील कलाकार (ज्यांना तुम्ही ‘एक्स्ट्रा’ म्हटले आहे) यांसह सर्वजण या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांना सन्मानाने काम करण्याचा अधिकार आहे तसेच, त्यांना किमान तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीकडून आदर मिळवण्याचा आणि समजूतदार वर्तनाचा अधिकार आहे,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा..
नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी काम करणार
लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक
संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर
वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?
‘जगभरातील देशांमध्ये आम्हाला सार्वजनिक ठिकाणे, सरकारी इमारती, कौन्सिल हॉल आणि यांसारख्या गोष्टींचा शूटिंगसाठी वापर करण्यास दिला जातो. या अनिष्ट वृत्तीमुळेच भारताला शूटिंगसाठी अनुकूल स्थान मानले जात नाही. त्यामुळेच आम्ही अनेकदा परदेशात शूटिंगला प्राधान्य देतो. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, परंतु हे वक्तव्य अवमानजक व प्रतिगामी वाटते,’ अशी टीका मेहता यांनी केली आहे.