अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री आमिशा पटेल यांच्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने आतापर्यंत ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शहा यांनी ‘गदर २’ हा चित्रपट भयंकर असल्याची प्रतिक्रिया दिली होती. चित्रपटाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना भीती वाटते आहे. ‘गदर २’सारखे चित्रपट यशस्वी होणे, हे धोकादायक असल्याचे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले होते. यावर आता ‘गदर २’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘नासिरसाहेबांनी आधी चित्रपट पाहावा,’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.
‘मी नसीरसाहेबांची ती प्रतिक्रिया वाचली. प्रतिक्रिया वाचून मी गोंधळलो. नसीरसाहेब मला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि मी कोणत्या विचारधारेचा आहे, हे तेही जाणतात. मला आश्चर्य वाटते की ते ‘गदर २’ चित्रपटाबद्दल अशा गोष्टी बोलत आहेत. मला केवळ इतकेच सांगायचे आहे की, ‘गदर २’ कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात नाही. तसेच, हा चित्रपट कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. ‘गदर २’ देशभक्तीने परिपूर्ण असा चित्रपट आहे. हा एक मसाला सिनेमा आहे. मला नसीरसाहेबांना केवळ एकच सांगायचेय की, तुम्ही केवळ एकदा ‘गदर २’ हा चित्रपट पाहा. मला विश्वास आहे, की ‘गदर २’ बघितल्यावर तुम्ही तुमचे विधान नक्की बदलाल,’ अशी प्रतिक्रिया अनिल शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.
हे ही वाचा:
दिल्लीतल्या ४५० पोलिसांना पंतप्रधानांकडून स्नेहभोजन
बिहारमध्ये बोट उलटून १८ विद्यार्थी बुडाले
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे
शौर्याला सलाम: जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली
‘चित्रपट जेवढा कट्टरवादी असेल, तेवढाच तो लोकप्रिय होईल. देशावर प्रेम करणे पुरेसे नाही. आता तुम्हाला त्याबद्दल ढोलही वाजवावे लागतील. तुम्हाला काल्पनिक शत्रूंना निर्माण करावे लागेल. परंतु या बाबी या लोकांना समजत नाहीत की जे हे करत आहेत, ते किती भयंकर आहे. मी आतापर्यंत ‘केरळ स्टोरी’ आणि ‘गदर २’पाहिलेला नाही. मात्र या चित्रपटांनी इतकी कमाई करणे, हे भयंकर आहे. हे भीतीदायक आहे. चुकीच्या गोष्टींचे कौतुक करणारे चित्रपट बनवले जात आहेत. कोणतेही कारण नसताना दुसऱ्या समाजाला खालच्या दर्जाचे समजले जात आहे. हा खरोखर भयंकर ट्रेन्ड आहे,’ असे नासिरुद्दीन शहा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले होते.
याआधी नासिरुद्दीन शहा यांनी ‘काश्मीर फाइल्स’वरही टीका केली होती. तेव्हा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘तुम्ही म्हातारे आणि अस्वस्थ झाले आहात,’ अशा शब्दांत त्यांना सुनावले होते.
नाना पाटेकर राष्ट्रवाद काय हे नसिरुद्दीनला विचारा!
यासंदर्भात नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली. नाना पाटेकर सध्या विवेक अग्निहोत्री यांच्या व्हॅक्सिन वॉरमध्ये नाना पाटेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यानिमित्ताने त्यांना नसिरुद्दीन शाह यांनी गदर २ आणि केरळ स्टोरीसंदर्भात जी मते व्यक्त केली त्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा नाना पाटेकर म्हणाले की, राष्ट्रवाद म्हणजे काय, याबद्दल तुम्ही नसिरुद्दीन यांना विचारले आहे का? मला वाटते की, देशाप्रती प्रेम व्यक्त करणे म्हणजेच राष्ट्रवाद आहे आणि ही अजिबात वाईट गोष्ट नाही. गदर २ या चित्रपटात अगदी हाच मुद्दा आहे. पण केरळ स्टोरी हा चित्रपट मी पाहिलेला नाही.