८२ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांमध्ये यावर्षी सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल “आनंदमयी पुरस्कार” दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रकल्पाला देण्यात आला. पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांचे आशीर्वाद मिळाले. या कार्यक्रमाप्रसंगी लतादीदींचे स्मरण सतत होत होते. त्याबद्दल दीपस्तंभचे यजुर्वेन्द्र महाजन यांनी आलेले अनुभव कथन केले.
ते म्हणतात की, विशेष म्हणजे पुरस्कारार्थीमध्ये अमिताभ बच्चन, ए. आर. रहमान, मा. अशोक सराफ, श्रीमती मंजीरी फडके, श्रीमती पद्मिनी कोल्हापुरे, रूपकुमार राठोड, भाऊ तोरसेकर, अतुल परचुरे, रणदीप हुडा अशी मान्यवर मंडळी होती. कार्यक्रम सुरू होण्याआधी अतिथी कक्षामध्ये द ग्रेट अमिताभजी बच्चन यांच्यासमोर बसून त्यांना ऐकता आले.
आजवर अक्षरशः हजारो कार्यक्रमात मी अतिथी म्हणून, सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहिलो आहे. परंतु हा कार्यक्रम अत्यंत आगळावेगळा ! आताही त्या क्षणांची आठवण काढताना डोळ्यात आनंदाश्रू आहेत आणि अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात ! संपूर्ण वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा भरून राहिली होती, असेही महाजन यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मंगेशकर कुटूंब भाऊ तोरसेकरांना ऐकते तेव्हा…
‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’
क्रिकेटचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू!
‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून सागरी प्राण्याला मिळाली नवी ओळख!
ते म्हणाले की, मोठ्या माणसांचा विनम्रपणा, इतरांना आदर देण्याची वृत्ती, अहंकाराचा लवलेशही नसणे, खरंच मोठी माणसं किती मोठी असतात आणि ती का मोठी असतात हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता आले, असे सांगताना महाजन म्हणतात की, मी आयोजकांना विनंती केली होती , मी एकटा हा पुरस्कार स्वीकारणार नाही. त्याप्रमाणे माझ्यासोबत खास थायलंडहून आलेले संस्थेचे ग्लोबल डायरेक्टर अमित व अपर्णा वाईकर, व माझी मुले राज, पंकज, लक्ष्मी, शुभम हे सर्व पुरस्कार स्वीकारताना होते. राजने हाताने व लक्ष्मीने पायाने काढलेली स्केचेस प्रमुख अतिथींना भेट देण्यात आली. अमिताभजींनी सगळ्या दिव्यांग मुलांची अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने चौकशी केली. भविष्यात याच प्रकारचे उत्तुंग कार्य घडावे, आणि देशातल्या, जगातल्या दिव्यांग, अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांचे आयुष्य उभारावे, यासाठी कदाचित निसर्गांने ही रचना केली असावी.
हा पुरस्कार संस्थेच्या उभारणीसाठी व विद्यार्थ्यांच्या नियमित निवासी शिक्षणासाठी निस्वार्थ योगदान देणारे शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक उद्योजक, कंपन्या, या सर्वांना अर्पण करतो. या सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला, निस्वार्थ योगदान दिले, म्हणूनच हे कार्य एवढ्या मोठ्या स्वरूपात उभे राहू शकले आहे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.