हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन सर्वांसाठीच आदर्श आहे. एक आदर्श राजा कसा असावा याचा वस्तुपाठ महाराजांनी घालून दिला. महाराजांच्या चरित्रातून राष्ट्र निर्माणासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी आत्मसात करता येतात. त्यामुळेच आता पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डींग असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पदव्युत्तर पदविका असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप असून या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असेल.
हे ही वाचा:
हात की सफाई; इकडचा कचरा तिकडे…
अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ
शस्त्रास्त्र साठ्यासह एकाला केले जेरबंद
सरकारचा अजब कारभार; कोविड सेंटरमध्ये शिकाऊ वैद्यकीय तज्ज्ञ
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली पण त्यासोबत त्यांनी एक आदर्श राज्य पद्धतीही निर्माण केली. युद्धनीती, प्रशासन पद्धती, अशा कुठल्याही राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांवरचे अनेक धडे आपल्याला महाराजांच्या चरित्रातून अभ्यासायला मिळतात. या साऱ्याची सांगड घालत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या एक वर्षाच्या पदविकेचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. सहा महिन्यांच्या दोन सत्रांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. एकूण आठ विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून त्याची दोन्ही सत्रात चार-चार अशी विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक विषयाला चार क्रेडिट आणि १०० गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण ३२ क्रेडिट आणि ८०० गुणांचा हा अभ्यासक्रम असणार आहे.
अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात छत्रपती शिवरायांचे युद्धशास्त्र व युद्धनीती तसेच नीतीकार छत्रपती शिवाजी महाराज हे विषय शिकवले जातील. तर यासोबत प्रॅक्टिकल कंपोनंट आणि रिसर्च मेथोडोलॉजी याचाही समावेश असेल तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार, महाराजांचे प्रशासन हे विषय असतील. तर त्या जोडीला फील्ड व्हिजिट आणि प्रोजेक्ट रिपोर्ट यांचा समावेश असेल.
१४ जून पासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून ७ जुलैपर्यंत विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. सध्या जगभर सुरू असलेल्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवला जाणार आहे.