शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन

शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १००व्या वर्षी सोमवारी पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब यांचे पार्थिव सध्या पर्वती येथील पुरंदर वाडा या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.  पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी लोटली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे चाहते हे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. तर राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरही बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात दाखल होत आहेत.

हे ही वाचा:

बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील

कार्तिकी एकादशीला माऊलीची आणि लेकरांची भेट होणार…

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाची बातमी कळताच ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. राज ठाकरे हे पुण्यात पुरंदरे वाड्यात पोहोचले असून त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हेही राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अंतिम दर्शन घेतले.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पुण्याचे महापौर मुरलीधर माहोळ यांनीही पुरंदरे वाड्यावर जाऊन बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनीही बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही पुरंदर वाड्यात जाऊन बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिनेही बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

बाबासाहेब यांच्या कार्याचा आलेख मोठा असून त्यांना अनेक नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण अशा मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या सर्व बाबी विचारात घेता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पर्वती पायथा निवासस्थानी बाबासाहेब पुरंदरांचे पार्थिव ८ ते १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version