हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि साप्ताहिक ‘विवेक’ चे माजी संपादक रमेश पतंगे यांचा अमृत महोत्सव सोहळा आज दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडणार आहे. दादर येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या या सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, तर पद्मभुषण डाॅ.अशोक कुकडे आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने ‘नंदादीप’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा केले जाणार आहे.
रमेश पतंगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक जडणघडणीतले एक महत्वाचे नाव. पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता अशा अनेक भूमिका आज वर त्यांनी लिलया पार पाडल्या. सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद अशा सामाजिक संस्थांच्या पायाभरणीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, तर ‘साप्ताहिक विवेक’ च्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावला. लेखक म्हणूनही त्यांचा भर हा कायम समाज प्रबोधनाचाच राहिला आहे. रमेश पतंगे यांचे लेखन आणि कार्य हे कायमच समाजाला दिशा देणारे राहिले आहे. त्यामुळे सरसंघचालकांच्या उपस्थित होणारा अमृत महोत्सव सोहळा हा पतंगे यांच्यातील कार्यकर्त्याचा सन्मान असणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रमेश पतंगे अमृत महोत्सव समितीतर्फे करण्यात आले असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विमल केडिया हे या समितीचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत.