कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान नव्याने डोके वर काढलेल्या म्युकरमायकोसिस रुग्णांच्या मृत्यूचा वैद्यकीय शिक्षण विभागाने विश्लेषणात्मक अभ्यास केला आहे. या अभ्यासातून मधुमेहाची तीव्रता अधिक असलेल्या आणि कोरोना उपचारात प्रतीजैविके आणि प्राणवायूची आवश्यकता भासलेल्या रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. राज्यातील एकूण आकडेवारीनुसार म्युकरमायकोसिसच्या १३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण १६ टक्के आढळले आहे.
राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १८,०५७ रुग्णांची म्युकरमायकोसिस तपासणी करण्यात आली असून त्यातील २,८७६ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले गेले. त्यातील ७५ टक्के रुग्ण बरे झाले असून ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील २४२ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘मनी हाइस्ट’ला मुंबई पोलिसांची म्युझिकल सलामी
मुंबईतील ‘बॅंक चोर’ नायजेरियन टोळीला ग्वालियरमधून अटक
भारतीय संघाच्या चिंता वाढल्या! रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव
प्रवाशांनो, ‘रूळ’ मोडू नका, पुलावरून जा!
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासानुसार मृतांपैकी सुमारे ६३ टक्के रुग्ण हे ५० वर्षांवरील आहेत. त्यात सर्वाधिक ६८ टक्के पुरुष रुग्ण आहेत. मृतांपैकी ९३ टक्के लोकांना कोरोनाची बाधा झाली होती; तर ७८ टक्के रुग्णांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांमधील ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली होती; तर ८१ टक्के रुग्णांना प्राणवायू देण्यात आला होता. ३९ टक्के रुग्ण हे कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी सध्या १,७४१ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या विषाणूमुळे रुग्णाच्या शरीरातील मधुमेहाची पातळी अचानकपणे वाढल्यास म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात आल्यावर आता रुग्णांमधील मधुमेह नियंत्रित ठेवला जातो. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत या आजाराचा धोका पुन्हा वाढायला नको यासाठी प्रतिजैविकांसह अन्य औषधांचा वापर विचारपूर्वक व योग्य रीतीने होणे गरजेचे आहे, असे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. अशेष भूमकर यांनी सांगितले.