शेवटचे तीन चेंडू धोनीने पाहिलेच नाहीत; पण जिंकल्यावर जाडेजाला उचलून घेतले

चेन्नईने गुजरातवर ५ विकेट्सनी मात केली. अखेरच्या षटकात जाडेजाने सामना चेन्नईसाठी खेचून आणला

शेवटचे तीन चेंडू धोनीने पाहिलेच नाहीत; पण जिंकल्यावर जाडेजाला उचलून घेतले

आयपीएल २०२३च्या उत्कंठापूर्ण अंतिम सामन्यात अष्टपैलू रवींद्र जाडेजाने चमक दाखवल्याने चेन्नईचा संघ विजयी ठरला. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आनंदाने उडी मारत मैदानात धाव घेऊन जाडेजाला मिठी मारत त्याला उचलले. चेन्नईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. या विजेतेपदामुळे चेन्नईने मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

रविवारी रंगणारा आयपीएलचा अंतिम सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना सोमवारी खेळवण्यात आला. गुजरातने २० षटकांत चार गडी गमावून २१४ धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले होते. मात्र सोमवारीही पावसाने व्यत्यय आणल्याने चेन्नईला १५ षटकांत १७१ धावा करावयाच्या होत्या. त्यामुळे सामन्याची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत होती.

 

चेन्नईला १३ धावा हव्या असताना खेळपट्टीवर शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा होते. तर, गुजरातच्या वतीने या हंगामात २७ बळी घेणारा मोहित शर्मा याच्याकडे गोलंदाजीची सूत्रे सोपवण्यात आली होती. त्याने टिचून गोलंदाजी केली. त्यामुळे चेन्नईला दोन चेंडूंमध्ये १० धावा करावयाच्या होत्या. मात्र पाचव्या चेंडूवरच जाडेजाने षटकार खेचला आणि शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार मारला. शेवटचे तीन चेंडू तर धोनीने पाहिलेही नाहीत.

हे ही वाचा:

‘द केरळ स्टोरी’ सुसाट; ३०० कोटींच्या क्लबकडे घोडदौड

ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये चुकून डागल्याने भारताच्या तिजोरीला पडला खड्डा

आयपीएलविजेत्या चेन्नईवर पैशांचा पाऊस

अखेरच्या दोन चेंडूंत जाडेजाने गुजरातला सीमापार फेकत चेन्नईला दिला आयपीएल चषक

रवींद्र जाडेजाने विजयी धाव घेतल्यानंतरच धोनीने डोळे उघडले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने घरच्या मैदानावर फेरी मारून विजयोत्सव साजर केला. त्यानंतर काही वेळातच धोनीने जाडेजाला उचलून त्याला आनंदाने मिठी मारली. धोनीने चेन्नईचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनलाही मिठी मारली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला यालाही धोनीने आलिंगन दिले. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबादेखील या क्षणी भावूक झाली होती.

Exit mobile version