धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘धर्मवीर २’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ठरली

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ हा सिनेमा चांगलाच गाजला. राजकीय वर्तुळात देखील या सिनेमाची चर्चा रंगली. अनेक निरुत्तरित प्रश्नांवर चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग पेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे.

ठाण्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. त्यानंतर ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅगलाईन देत ‘धर्मवीर २’ ची घोषणा करण्यात आली होती. आता पहिल्या धर्मवीर सिनेमाच्या तुफान यशानंतर ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘धर्मवीर २’ चा पोस्टर लाँच सोहळा पार पडला.

‘धर्मवीर २’ हा बहुचर्चित चित्रपट क्रांतीदिनी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरवरचे “आपलं अस्तित्व… फक्त हिंदुत्व!”, “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…”, “हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” असे काही संवाद सर्वांचं लक्ष वेधून घेतात. ‘धर्मवीर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र, हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘धर्मवीर २’ सिनेमाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे.

हे ही वाचा:

प. बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

… म्हणून टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच

देशभरात लागू झाले नवे तीन फौजदारी कायदे

पंतप्रधानांची जनतेशी पुन्हा ‘मन की बात’

‘धर्मवीर २’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘धर्मवीर २’ हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

‘धर्मवीर २’ सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची, तर क्षितीश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.

Exit mobile version