भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे आज, शुक्रवारपासून मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भोजशाळेचे सर्वेक्षण सुरू केले जाईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, येथे खोदकाम सुरू होईल. भोजशाळा प्रकरणी इंदौरमध्ये याचिका दाखल झाली असून सुनावणीनंतर फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने हे आदेश दिले होते.
भोजशाळेवरून गेल्या कित्येक वर्षांपासून वाद आहेत. या भोजशाळेवर हिंदू आणि मुस्लिम समाज असे दोन्ही हक्क सांगत आहेत. हिंदू पक्षाच्या म्हणण्यानुसार, येथे सरस्वती मंदिर आहे. तर, मुस्लिम पक्ष भोजशाळेला मुस्लिम प्रार्थनास्थळ मानतो. भोजशाळेची जेव्हा निर्मिती झाली, तेव्हा त्याची बांधकामशैली आणि दगडांवर कशा प्रकारच्या खुणा आहेत, हे तपासण्याचे काम तज्ज्ञांचे पथक करणार आहे. त्यासाठी येथे खोदकामाला सुरुवात झाली आहे. पथकाकडून त्यांचा अहवाल न्यायालयाला सादर केला जाईल.
सन १९०२मध्येसुद्धा सर्वक्षण झाले होते, असे भारतीय पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. या सर्वेक्षणातील माहिती अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सादर केली. भोजशाळेची वास्तुरचना भारतीय शैलीची असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले होते. भोजशाळेत हिंदू चिन्हे, संस्कृतच्या शब्दांचा वापर करण्यात आला आहे. येथे विष्णूच्या प्रतिमाही आहेत. त्याचे पुरावे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सादर केले. भोजशाळेत हिंदू समाजाला नियमितपणे पूजा करण्याचा अधिकार आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. येथे मुस्लिम समाजाकडून नमाज पठण केले जाते. येथे हिंदूंचे मंदिर असल्याने नमाज पठणाला विरोध केला पाहिजे, असेही यात नमूद केले आहे.
हे ही वाचा:
आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक
मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!
‘विकसित भारत’चे मेसेज शेअर करू नका!
राहुल गांधींची भूमिका इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या भूमिकेशी विसंगत
राजाभोजने बनवले होते सरस्वती मंदिर
भोजशाळेचा इतिहास एक हजार वर्षांहून अधिक जुना आहे. हिंदू संघटनेनुसार, भोजशाळेची निर्मिती धारचा राजा भोजने केली होती. सरस्वती सदनच्या रूपात भोजशाळा ही शिक्षणाचे केंद्र होती. राजवंश काळात येथे सुफी संत कमाल मौलाना यांची दर्गा बनली. मुस्लिम समाज येथे नमाज पठण करू लागला. त्यानंतर ही भोजशाळा नव्हे तर दर्गा आहे, असा दावा केला जाऊ लागला. इंग्रजांच्या काळातही भोजशाळेवरून वाद झाला. सन १९०२मध्ये लॉर्ड कर्जन धार, मांडूच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी भोजशाळेत्या देखभालीसाठी ५० हजार रुपये खर्चाला मंजुरी दिली होती. सन १९५१मध्ये भोजशाळेला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हा काढलेल्या अधिसूचनेत भोजशाळा आणि कमाल मौला मशिदीचा उल्लेख करण्यात आला होता.
नमाजवर परिणाम नाही
या सर्वेक्षणामुळे शुक्रवारी होणाऱ्या नमाजवर परिणाम होईल, असे सांगितले जात होते. मात्र सर्व सुरक्षाव्यवस्था चोख करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारची नमाजही होईल, असेही त्यांनी सांगितले.