धार भोजशाळा-कमल मौला मस्जिद परिसरात सापडली सरस्वतीची मूर्ती

सर्वेक्षण अहवालात ३७ देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या

धार भोजशाळा-कमल मौला मस्जिद परिसरात सापडली सरस्वतीची मूर्ती

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआयने सोमवार, १५ जुलै रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात ऐतिहासिक असा धार येथील भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे. धार येथील भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. यानंतर इंदूर उच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला भोजशाळेच्या ५०० मीटरच्या परिघात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या निर्देशानंतर २२ मार्चपासून सर्वेक्षण सुरू झाले होते जे २७ जूनपर्यंत चालले. या ९८ दिवसांच्या सर्वेक्षणात या भागात अनेक ठिकाणी उत्खनन करण्यात आले, त्याची छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीही करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) चीही मदत घेण्यात आली आहे. यानंतर सोमवारी एएसआयने मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा-कमल मौला मस्जिद संकुलाच्या सर्वेक्षणाचा अहवाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सादर केला आहे.

एएसआयचे वकील हिमांशू जोशी यांनी सांगितले की, २ हजार पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. एएसआयने २२ मार्चपासून सर्वेक्षण सुरू केले, जे ९८ दिवस चालले. हिंदू बाजूने याचिकाकर्त्याचा दावा आहे की, एएसआयच्या सर्वेक्षणादरम्यान भोजशाळेत देवी-देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. हिंदू समुदाय भोजशाळेला वाग्देवीचे (देवी सरस्वती) मंदिर मानतो, तर मुस्लिम समुदाय याला कमल मौला मशीद म्हणतात. हे संकुल एएसआयद्वारे संरक्षित आहे.

एएसआयचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण करण्यात आले. या काळात उत्खननात १७०० हून अधिक पुरातन वस्तू सापडल्या. यामध्ये ३७ देवी-देवतांच्या मूर्तींचाही समावेश आहे. उत्खननात सापडलेली सर्वात खास मूर्ती म्हणजे माँ वाग्देवीची खंडित मूर्ती. याशिवाय भगवान कृष्ण, जटाधारी भोलेनाथ, हनुमान, शिव, ब्रह्मा, वाग्देवी, भगवान गणेश, माता पार्वती, भैरवनाथ आदी देव-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे.

हे ही वाचा:

वजन कमी करण्यासाठी डबाच न खाण्याचा केजरीवाल फॉर्म्युला

पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, नाव बदलून यूपीएससीची दिले दोन अटेंम्प्ट !

मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !

पुण्यात ‘झिका’चा वाढता प्रादुर्भाव; २३ जणांना लागण

१९०९ मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले हते. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. सध्या त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. १९३५ मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. १९५५ मध्ये येथे वाद झाला आणि त्यानंतर या परिसरात मंगळवारी पूजा करण्‍यास तर शुक्रवारी नमाज अदा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती.

Exit mobile version