भारत सरकारच्या नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो या विमान कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. एका दिव्यांग व्यक्तीला विमानात बसण्यास नकार दिल्याबद्दल नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने इंडिगो एअरलाईन्सवर मोठी कारवाई करत दंड ठोठावला आहे. रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
इंडिगो या विमान कंपनीने ७ मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले. विमान कंपनीवर कडक कारवाई करत नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने या कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या घटनेवर इंडिगो कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित अपंग मुलगा खूप घाबरला आणि आक्रमक झाला होता. त्यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच ग्राउंड स्टाफ शेवटपर्यंत हा मुलगा शांत होण्याची वाट पाहत होता. मात्र, तसे काहीही न झाल्यामुळे अखेर त्याला विमानात चढण्यापासून रोखण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
“मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी तरी हनुमान चालीसा वाचावी”
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या २१ गोष्टींचे अभिवाचन
‘हिंदुत्व धर्म नही इतिहास है’! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
मात्र, नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने या घटनेबाबत कंपनीला फटकारले आहे. कंपनीचे ग्राउंड स्टाफ एका अपंग मुलाला नीट हाताळू शकले नाहीत. या प्रकरणात त्यांना अधिक संवेदनशीलपणे वागायला हवे होते. मुलाशी सहानुभूतीने वागायला हवे होते, जेणेकरून तो शांत झाला असता. असे केले असते तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रवाशाला विमानात बसवण्यास नकार देण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले नसते, असे नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे. या प्रकरणी नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर या कंपनीला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला.