राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार असून राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. पुढील सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. याच दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट देखील यासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु, या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतः आज (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा जो निर्णय असेल तो आमच्यासाठी अंतिम असून आम्हाला तो मान्य असल्याचे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या प्रचाराचा आणि महायुतीला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. अडीच वर्षात केलेल्या कामांचा पाढ वाचत यामध्ये समाधानी असल्याचे म्हटले. जनता-कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे हे सर्व शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींची आभारही मानले.
ते म्हणाले, आम्ही केलेल्या कामामुळे मतांचा वर्षाव झाला. बहिणींनी सावत्र भावांवर व्यवस्थित लक्ष ठेवले आणि सख्ख्या भावावर विश्वास ठेवला. आम्ही नाराज आहोत याची चर्चा आहे, पण आम्ही नाराज होवून रडणारे नाहीतर लढणारे लोक आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची सेवा करत राहीन, असे शिंदे म्हणाले.
हे ही वाचा :
झारखंडमध्ये भाजपला मतदान केले म्हणून हिंसाचार
इस्कॉनवर बंदी घालण्याची बांगलादेश न्यायालयात मागणी
हिजबुल्ला-इस्रायलमधील युद्ध थांबले !
संभल हिंसाचार; आरोपींचे पोस्टर लावा, बक्षीस जाहीर करा, नुकसान भरपाई वसूल करा!
राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर माझे काल बोलणे झाले, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे मी म्हटले. गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील माझे बोलणे झाले, तुमचा निर्णय हा अंतिम असेल, यामध्ये आमची कोणतीच अडचण नसल्याचे मी सांगितले. महायुतीला मजबूत बनवून, आम्हाला पुन्हा एकत्र काम करायचे आहे, असे शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेचे मला प्रेम मिळाले, मी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांची भावना आहे, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मात्र, अडीच वर्ष त्यांनी आम्हाला पाठींबा दिला आता आमचा देखील पुढील मुख्यमंत्र्याला पाठींबा असणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे आता पुढील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील अशी चर्चा होत आहे.