छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोमवार, १७ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महाराजांचे मंदिर कशासाठी तर आज आपण आपल्या इष्ट देवतेच्या मंदिरात जाऊन देवतेची साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव, देश आणि धर्माची लढाई जिंकली म्हणून आपण हिंदू आहोत आणि आपल्या देवतांचे दर्शन घेऊ शकतो. जसे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्री रामांचे दर्शन पूर्ण होत नाही तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन फळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
औरंगजेबच्या कबरीबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “इथे महिमा मंडण होईल तर शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व विभागाने ५० वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडण कधीच होणार नाही,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अठरा पगड जातीच्या लोकांनी अटकेपार झेंडे रोवत शौर्य दाखवले. हेच शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला देणं म्हणून दिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे लोक आपले दैवत आहेत, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. प्रभु श्रीराम रामांनी लोकांना सोबत घेऊन रावणाचे पतन केलं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी देखील केलं आणि मोघलांना पराभूत केलं. देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती जगले त्याचप्रमाणे आपण या छत्रपतींच्या मंदिरात जाताना आपण मनात विचार आणून जावं, असं फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा..
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या पॉडकास्टला सोशल मीडियातून शेअर केले
उदयपूर: अरविंद सिंह मेवाड यांचे दीर्घ आजाराने निधन
‘ॲपल’ भारतात निर्यातीसाठी एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत
हिंदूंना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केल्याप्रकरणी चौघांना अटक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’मध्ये जागतिक वारसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हे नामांकन मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संगमेश्वरला सरदेसाई वाड्याच्या विकासाचं काम हाती घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाईल. तसेच आग्रा येथे ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना नजर कैदेत ठेवले होते तिथे स्मारक म्हणून विकसित करण्यासाठी जागा सरकारला द्यावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारला विनंती केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पानिपत येथे देखील एक स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.