‘पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईत पूरपरिस्थिती उद्भवणे ही सामान्य बाब आहे. मात्र तरीही मुंबईतील न्यायालये एक दिवसही कामकाज थांबवत नाहीत,’ असे मुंबईच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एसव्ही गंगापूरवाला यांनी सांगितले. चेन्नईत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे तसेत, शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित असल्यामुळे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहू न शकलेल्या किंवा कागदपत्रे मिळू न शकलेल्या वकिलांच्या दाखल केलेल्या याचिकांना स्थगिती देताना हे वक्तव्य केले.
चेन्नईला सध्या मिचाँग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडून शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही काही वकील न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते. मात्र अनेक घरांत तसेच कार्यालयांत पुराचे पाणी गेल्याने खटल्यांशी संबंधित काही कागदपत्रे मिळत नसल्याने खटल्यांना स्थगिती देण्याची मागणी वकिलांनी केली होती. त्यावर मुख्य न्यायाधीशांनी स्थगिती दिली मात्र आजच्या दिवशी शहरात पूरपरिस्थिती आल्यामुळे अशी गैरसोय झाली आहे, हे सांगणे सर्वांत सोपे कारण आहे, असे ताशेरेही ओढले.
हे ही वाचा:
हमासच्या नेत्याने पाकिस्तानला शूर म्हणत इस्रायलचे हल्ले थांबवण्यासाठी केली मागणी!
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत ‘गरब्याची’ नोंद!
पाकव्याप्त कश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एक जागा राखीव
निफ्टीची जाहिरात चक्क कोरिया रेल्वे स्टेशनवर झळकली आणि…
एका महिला वकिलाने तिच्या घराच्या जवळील परिसरात पाणी साचले आहे, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर ‘मुंबईत दरवर्षी जुलैमध्ये पावसाळ्याच्या मोसमात पाणी साचते. संपूर्ण शहर जलमय झालेले असते. मात्र न्यायालय एक दिवसही आपले कामकाज बंद करत नाही. न्यायालयाचे कर्मचारी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत तरीही न्यायालयातील कामकाज थांबत नाही,’ असे मुख्य न्यायाधीश म्हणाले. त्यानंतर न्यायाधीशांनी या महिला वकिलाला त्या कुठल्या भागात राहतात, असे विचारले आणि स्टेट गव्हर्नमेंट प्लीडर (एसजीपी) यांना पालिका कर्मचाऱ्यांना त्यांची समस्या सोडवण्याचे निर्देश देण्याची सूचना केली.