आगामी शिवजयंती उत्सवानिमित्त चिपळूणनजिकच्या डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात आठव्या राज्यस्तरीय ‘डेरवण युथ गेम्स २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ फुटबॉल गोलकीपर हेन्री मॅनेझिस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ‘अपयशाने कधीही घाबरून जायचे नाही. अपयशातूनच नंतर यशाची निर्मिती होत असते’, असे वक्त्यव्य हेन्री यांनी केले आहे.
काल या ‘डेरवण युथ गेम्स’चा प्रारंभ झाला. तर उद्घाटन समारंभ फुटबॉल गोलकीपर हेन्री यांच्या हस्ते झाला. आणि या कार्यक्रमाची सुरुवात कोकणातील आंतरराष्ट्रीय खो -खोपटू आरती कांबळे हिच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन करण्यात आली.
गेली दोन वर्षे करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा फारशा होत नसताना डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलात होत असलेल्या डेरवण यूथ गेम्स २०२२ या स्पर्धेबद्दल हेन्री यांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला आहे. क्रीडा स्पर्धांसाठी दाखल झालेल्या खेळाडूंना त्यांनी स्वतःचे उदाहरण देत, खेळासाठी मेहनत घेण्याचे आणि खेळाचे महत्त्व पटवून दिले. उद्योजक कमलेश जोशी यांनी या वेळी आपल्या भाषणातून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला संस्थेच्या शिक्षण संचालिका शरयू यशवंतराव, विश्वस्त बाळासाहेब काजरेकर, राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अजित गाळवणकर, एसव्हीजेसीटीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते.
एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात २१ मार्चपर्यंत अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुध्दीबळ, कॅरम, लंगडी, खो खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या राज्याच्या विविध भागांतून खेळाडू, संघ डेरवण येथे दाखल होत आहेत. सुमारे साडेसहा हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संघांमधील अटीतटीच्या लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमीही येथे येऊ लागले आहेत. करोनाविषयक खबरदारी घेऊन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
नवाब मालिकांना न्यायालयाचा दणका; ईडीने केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच
राम गोपाल वर्मा म्हणतो काश्मीर फाईल्स नंतर ‘विवेक’वूड
अनेक राज्यांत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त!
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल
या क्रीडा महोत्सवाची सुरुवात कॅरम, फुटबॉल, खो -खो, लंगडी या खेळांनी करण्यात आली. सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, ठाणे, पुणे, मुंबई येथून दाखल झालेल्या संघांमध्ये लढती सुरू झाल्या आहेत. उद्घाटनानंतर लंगडी, खो- खो, फुटबॉल या खेळांच्या स्पर्धा रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या. आज क्रीडासंकुलात खो-खो, लंगडी, व्हॉलिबॉल इत्यादी खेळांचे सामने रंगणार आहेत.