लोकशाहीचा खरा विचार हा हिंदुत्वाचाच विचार आहे, तो हिंदू विचारच आहे असे मत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते जेष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होते.
हे ही वाचा:
हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व साप्ताहिक विवेकचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, समरसता चळवळीचे प्रणेते रमेश पतंगे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्याशिवाय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय लोकशाही विषयीचे आपले विचार बोलून दाखवले. “भारतीय संविधानाची तत्व ही परकीय विचारातून घेतली नसून ती भारतीय विचारांतून घेतली आहेत असे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. लोकशाहीचा विचार हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकत्र स्वतंत्र झाले पण पाकिस्तानात लोकशाही टिकली नाही आणि भारतात ती टिकली कारण लोकशाहीचा मूळ विचारच हिंदू विचार आहे.” अशी मांडणी फडणवीस यांनी केली
“संविधानातील भाव आणि संघ निर्मिती मागचा भाव सारखाच, तो म्हणजे आपलेपणा!” – सरसंघचालक
याच सोहळ्यात बोलताना, भारतीय संविधानात सांगितलेला आपलेपणाचा भाव आहे आणि हे आपलेपणाचे अमृत देशाला द्यायचे म्हणूनच डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले होते. रमेशजी पतंगे यांचा अमृत महोत्सव म्हणजे फक्त वयाची ७५ वर्षे पूर्ण करताना साजरा होणारा महोत्सव नसून तो आपलेपणाचे अमृत समाजाला देण्याचा उत्सव आहे असा विचार त्यांनी बोलून दाखवला. तर ‘संघ’ म्हणजे ‘ढाई अक्षर प्रेम के’ असेही ते म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश पाठवला असून अभिनेता सचिन खेडकर यांच्या आवाजात त्या संदेशाचे वाचन ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांसमोर सादर केले गेले. ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त ‘नंदादीप’ या विशेष गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.