कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने या वर्षीही गणपतीसाठी नियमावली जाहीर केली आहे. नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची पूजा करून उत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा अधिक ओढा आहे. शाडूच्या मातीपासून बनलेल्या मूर्तींसोबतच चॉकलेटपासून बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तींनाही मागणी असल्याचे चित्र आहे.
लाल माती, शाडूची माती आणि शेणखताचा वापर करून ‘गो ग्रीन’ गणेशोत्सव साजरा होणार आहे. बाजारात शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींसोबतच चॉकलेटपासून बनवलेल्या मूर्तींना मागणी आहे. दोन्ही मूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करता येते, त्यामुळे अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे.
हे ही वाचा:
सरसंघचालकांनी घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, गोवर्धन पिठाच्या शंकराचार्यांशीही भेट
लीड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत
रेल्वेच्या हेल्पलाइनवर विसरभोळ्यांची गर्दी
संशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा
कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची नियमावली तयार करण्यात आली आहे. शिवाय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरगुती मूर्ती आणि सार्वजनिक मंडळे यांनाही नियमावली देण्यात आली आहे. घरगुती मूर्ती २ फुटांची असावी. घरातील संगमरवरी किंवा धातूच्या मूर्तीचे पूजन करावे, शाडूच्या मूर्ती असल्यास मूर्तीचे घरीच विसर्जन करावे, अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमावलीमुळे गणेशोत्सव कसा साजरा करायचा हा प्रश्न भाविकांना पडला होता; मात्र ‘गो ग्रीन बाप्पा’ संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा भक्तांचा कल आहे.
मागील चार वर्षांपासून लाल माती, शेणखत आणि कागदाच्या लगद्यापासून बाप्पाची मूर्ती बनवत आहे. दोन वर्षात दुबई, थायलंड येथेही मूर्ती पाठवल्या आहेत. सुरुवात तीन मूर्तींपासून केली होती. मात्र यंदा २५० मूर्ती घरपोच करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती संकल्पनाकार सोनाली कुंभार यांनी दिली. बिटर किंवा कडवट असलेल्या डार्क चॉकलेटपासून बाप्पाची मूर्ती तयार केली जाते. विसर्जनाच्या वेळी या मूर्तीचे विसर्जन दुधात केले जाते आणि त्यानंतर विरघळलेल्या मूर्तीचा चॉकलेट मिल्कशेक बनवून तो प्रसाद म्हणून वाटला जातो, असे ब्रँडगुरू जान्हवी राऊळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.