दिल्लीसह आजूबाजूच्या परिसराला धुके आणि प्रदूषणाने जबरदस्त विळखा घातला असून यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. बुधवार, १३ नोव्हेंबरच्या सकाळी, दिल्ली- एनसीआर, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश भागात या मोसमातील आतापर्यंतचे सर्वात दाट धुके दिसले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सकाळी ६ वाजताच्या सुमारास दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० मीटर दृश्यमानता होती, तर पंजाबमधील हिंडन विमानतळ आणि अमृतसर विमानतळावर शून्य दृश्यमानता नोंदवण्यात आली. रस्ते वाहतूक मंदावली असून गाड्यांना भल्या पहाटेही हेडलाईटचा वापर करावा लागत आहे. मात्र, जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा धुक्याचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीसह उत्तर भारतातील हवामानातील अचानक बदल आणि दाट धुक्यासाठी अनेक पर्यावरणीय कारणे आणि हंगामी क्रियाकलाप जबाबदार असू शकतात, असे मत नोंदवण्यात येत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम अशा सर्वच राज्यात आकाशात पहाटे दाट धुके दिसत आहे. तसेच तापमानात घट झाल्याने नागरिकांना थंडीही जाणवू लागली आहे. हरियाणातील सोनीपतमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यांवरील वाहनांचा वेग कमी करण्यासोबतच धुके आणि धुक्याचा परिणाम सोनीपतमधून जाणाऱ्या गाड्यांवरही दिसून येत आहे. दिल्ली- अंबाला आणि अंबाला- दिल्ली जाणाऱ्या अनेक गाड्या वेळापत्रकापेक्षा उशिराने धावत आहेत.
हे ही वाचा:
भाजपा-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे!
महाराष्ट्रात १९९५ नंतर हे प्रथमच घडते आहे…
बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?
रशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!
दुसरीकडे, दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा एक चिंतेचा विषय आहे. दिल्लीचा AQI गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब आणि अनेक ठिकाणी गंभीर श्रेणीत आहे. हिवाळा जसजसा वाढत जातो तसतशी दिल्ली आणि आसपासच्या भागात वायू प्रदूषणाची पातळी लक्षणीय वाढते, जी लोकांच्या आरोग्यासाठी एक गंभीर समस्या आहे. आज, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिल्लीत सरासरी AQI ३४९ नोंदवला गेला, जो अत्यंत खराब श्रेणीत येतो. त्याचवेळी हलक्या थंडीसोबत धुकेही पडत आहे. दिल्लीतील हवेचे प्रदूषण आणि आकाशातील धुके वाढण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये वाहनांमधून उत्सर्जित होणारा धूर, बांधकाम, औद्योगिक प्रदूषण आणि भुसा अथवा पेंढा जाळणे यांचा समावेश आहे. दिल्ली सरकार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत.