मुसळधार पावसामुळे नवी दिल्लीतील अनेक भागांमध्ये शनिवारी पाणी साचले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दिल्ली सरकारवर टीका केली. ट्विटरवर अनेकजण केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर टीका करत होते.
दिल्लीतील मुख्य हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग निरीक्षण केंद्र येथे शनिवारी सकाळी साडेआठ ते ११.३०पर्यंत सुमारे २१.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर, रिज निरीक्षण केंद्रात ३६.४ मिमी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे नवी दिल्लीतील अनेक रस्ते जलमय झाले होते. परिणामी, अनेक ठिकाणी प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शनिवारी दिवसभरात पाणी साचल्याच्या १५ तक्रारी आल्या. तर, अनेक दिल्लीकरांनी ट्विटरवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून दिल्ली प्रशासनाचे गैरव्यवस्थापन आणि अपुऱ्या मलनि:सारण व्यवस्थेचा फोलपणा उघडकीस आणला. अनेकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करून या गैरव्यवस्थापनाचा जाब विचारला.
हे ही वाचा:
प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; पंचायत निवडणुकीत १८ ठार
गावकऱ्यांचे भाग्यच उजळले; मिळाले प्रत्येकाला तब्बल ५८ लाख
विंडीजचा १४० किलोचा कॉर्नवॉल भारताला पडेल भारी?
अनेक दिल्लीकरांनी निवासी तसेच, वाहतुकीच्या मार्गावर साचलेल्या पाण्याची छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट केली. अनेक ठिकाणी गाड्या पावसाच्या पाण्यात अर्ध्यापर्यंत बुडाल्याचेही दिसत होते. काही ट्विटर वापरकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. मुसळधार पाऊस पडत असताना परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे, याची अजिबातच कल्पना प्रशासनाला नाही, अशा शब्दांत काहींनी सरकारचा समाचार घेतला.
एका ट्विटरने तर प्रशासनाने पुन्हा मागे जाऊन प्राथमिक व्यवस्थापनाचे धडे गिरवले पाहिजेत, अशी टीका केली. तर, दुसऱ्याने राममनोहर लोहिया रुग्णालयाचे छायाचित्र पोस्ट केले. तेथील पार्किंगच्या जागेत पाणी साचले होते. मात्र प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तर, काहींनी मीम्स करूनही आपली नाराजी दर्शवली. भारतीय हवामान विभागाने रविवारीही पावसाची शक्यता वर्तवली असून दिल्लीसाठी ‘पिवळा अलर्ट’ जाहीर केला आहे.