दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.हॉस्पिटलमध्ये उपचारा घेण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणाने शरीरामध्ये झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी ३९ पैशांची नाणी आणि ३७ चुंबकाचे तुकडे गिळले.तरुणाच्या पोटात प्रचंड दुखू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.तरुण मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याला नाणी खाण्याची सवय लागल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.
लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.तरुण मित्तल यांनी सांगितले की, तरुणाच्या पोटात प्रचंड दुखत असल्याचे सांगत त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात त्याला आणले.त्यावेळी त्यांनी सोबत एक्स-रे आणला होता, त्यामध्ये नाण्यासारख्या काही गोष्टी दिसत होत्या.यानंतर रुग्णाच्या पोटाचे सिटी स्कॅन करण्यात आले.तेव्हा पोटामध्ये नाणी आणि चुंबकाचे तुकडे दिसून आले.यानंतर रुग्णाला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले, असे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टर पुढे म्हणाले की, रुग्णाच्या पोटाची संपूर्ण तपासणी करण्यात आली.तरुणाच्या पोटामध्ये नाणी आणि चुंबकाचा मोठा साठा असल्याचे दिसून आले.शस्त्रक्रिया करून तरुणाच्या पोटातील सर्व नाणी बाहेर काढण्यात आले.रुग्णाच्या पोटातून एक रुपया, दोन रुपया आणि पाच रुपयाची अशी एकूण ३९ नाणी बाहेर काढण्यात आली.रुग्णाने वेगवेगळ्या आकाराचे ३७ चुंबकीय तुकडे गिळले होते.हे सर्व चुंबकीय तुकडे शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले.
हे ही वाचा:
“मराठा समाजाचे आरक्षण घालवायलाही आणि आरक्षण न मिळायलाही शरद पवारच जबाबदार”
जरांगेच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी, राहुल नार्वेकर यांचे निर्देश!
संपवून टाकू, निपटून टाकू हे बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये आली कुठून?
डॉ.तरुण मित्तल पुढे म्हणाले की, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पोटाचे स्कॅनिंग केले असता, सर्व नाणी आणि चुंबकीय तुकडे बाहेर निघाल्याचे दिसून आले.उपचारानंतर रुग्णाला सात दिवसानंतर घरी सोडण्यात आले.डॉक्टर पुढे म्हणाले की, रुग्ण हा मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.रुग्णाच्या वाचनामध्ये कुठे तरी असे आले की, शरीर मजबुतीसाठी झिंक आवश्यक आहे.
नाण्यांमध्ये झिंक असते आणि शरीर मजबूत राहते या उद्देशाने तरुणाने ही सर्व नाणी खाल्ली, हे सर्व तरुणाने आम्हाला सांगितले, असे डॉक्टर म्हणाले.डॉक्टर म्हणाले की, चुंबकाचे तुकडे का खाल्लेस असे विचारले असता, रुग्ण म्हणाला की, पोटात गिळलेली नाणी बाहेर पडू नयेत म्हणून चुंबकाच्या तुकड्यांचा वापर केला, चुंबक पोटातील नाणी बाहेर पडण्यापासून रोखतील आणि त्यामुळे माझ्या शरीराला नाण्यांमधील झिंक शोषण्यास मदत होईल.