फोगाट, बजरंग निवडीसंदर्भात शनिवारी न्यायालय देणार निर्णय

अंतिम पंघल, सुजीत यांनी केली होती याचिका

फोगाट, बजरंग निवडीसंदर्भात शनिवारी न्यायालय देणार निर्णय

कुस्तीगीर विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचणी न घेता थेट निवड केल्यामुळे काही खेळाडू नाराज झाले. त्या खेळाडूंनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आता त्यावर २२ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

 

न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांनी २१ जुलैला निकाल राखून ठेवला. २० वर्षांखालील मुलींच्या गटात जागतिक विजेती ठरलेली अंतिम पंघल आणि २३ वर्षांखालील गटात आशियाई विजेता ठरलेला सुजीत कलाकल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. फोगाट आणि पुनिया यांना थेट प्रवेश का देण्यात आला अशी विचारणा त्यांनी या याचिकेतून केलेली आहे.

 

 

न्यायमूर्तींनी यासंदर्भात सांगितले की, कोण सर्वोत्तम आहे हे दाखविण्याचा न्यायालयाचा प्रयत्न नाही. पण या निवडीसाठी योग्य प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला की नाही, हे पाहावे लागेल. फोगाट ही ५३ किलो वजनी गटातून तर बजरंग ६५ किलो वजनी गटातून खेळतात. पण गेल्या वर्षभरात ते कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेत खेळले नाहीत तसेच त्यांनी गेल्या सहा महिन्यात सरावही केला नाही. असे असतानाही त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी का निवडण्यात आले असा या खेळाडूंनी सवाल उपस्थित केला आहे.

 

 

भारतीय ऑलिम्पिक समितीच्या हंगामी समितीने खेळाडूंची चाचणी २२ व २३ जुलैला ठेवली आहे. पण त्यात फोगाट आणि विनेश यांना सूट दिली. तर साक्षी मलिक, सत्यव्रत कादियान, संगीता फोगाट यांना मात्र चाचणीला सामोरे जावे लागेल असा निर्णय घेतला. त्याविरोधात पंघल आणि कलाकल हे खेळाडू न्यायालयात गेले.

 

 

न्यायालयात या खेळाडूंचे वकील हृषिकेश बरुआ आणि अक्षय कुमार यांनी सांगितले की, या दोन खेळाडूंची जी थेट निवड झाली आहे ती रद्द करण्यात यावी आणि त्यांना सूट देऊ नये. बरुआ यांनी म्हटले की, कुस्तीगीर महासंघाच्या आमसभेने खेळाडूंना चाचणीतून सूट दिली जाणार नाही, असा ठराव ऑगस्ट २०२२ला संमत केला आहे. हंगामी समितीच्या वतीने न्यायालयात उभे राहिलेल्या वकिलांनी सांगितले की, असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तेव्हा न्यायालयाने त्याच्या पुष्ट्यर्थ प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.

Exit mobile version