नव्या वर्षात दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून राजधानीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाचं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार, ७ जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे अखेर दिल्ली विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यानुसार ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याला सुरुवात करण्याची तारीख १० जानेवारी २०२५ आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत १७ जानेवारी पर्यंत असणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २० जानेवारीपर्यंत असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल तर निकाल ८ फेब्रुवारीला लागणार आहे.
दिल्लीत ११ जिल्ह्यांमधील ७० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. दिल्लीत १.५५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी त्यापैकी ८३.४९ लाख पुरुष आणि ७१.७४ लाख महिला आहेत. तरुण मतदारांची संख्या २८.८९ लाख आहे, तर प्रथमच मतदान करण्यास पात्र तरुणांची संख्या २.०८ लाख आहे. राजधानीत २६९७ ठिकाणी एकूण १३,०३३ मतदान केंद्रे असतील. दिल्ली विधानसभेत बहुमतासाठी ३६ आमदारांची आवश्यकता आहे.
हे ही वाचा..
गुजरातमध्ये ‘आप’ नेता बनला अन्नामलाई, स्वतःला मारले पट्ट्याचे फटके
पुराव्यांशी छेडछाड कराल तर याद राखा, म्हणत आसाराम बापूला ‘वैद्यकीय जामीन’
इंटरपोलप्रमाणे भारताचा आता ‘भारतपोल’; नवे पोर्टल कसे करणार काम?
नागपुरात एचएमपीव्हीची दोन मुलांना लागण
राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. आप पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी उत्सुक असून भाजपा दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यास जोर लावत आहे. तर, काँग्रेसही आपली प्रतिष्ठा जपण्याच्या प्रयत्नात असणार आहे. लोकसभेमध्ये इंडी आघाडीच्या माध्यमातून आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपने सुरुवातीलाचं एकला चलो चा नारा दिला.