तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यासंबंधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज या घटनेची संसदेत माहिती दिली. काल घडलेल्या अपघाताबद्दल राजनाथ सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली. बिपीन रावत यांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली.
कुन्नूर एअर बेसवरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. त्यानंतर १२ वाजून ०८ मिनिटांनी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. त्यानंतर कुन्नूर जवळ काही स्थानिक लोकांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना लष्करी हेलिकॉप्टरच्या अवशेषांना आग लागलेली दिसली, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
त्यानंतर बचावकार्य सुरू झाल्यावर जखमींना तात्काळ बाहेर काढून वेलिंग्टनच्या रुग्णालयात नेण्यात आले. माहितीनुसार त्या हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यू झाला त्यात सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश होता. संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखवीनदर सिंग लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरविंद सिंग आणि एअर फोर्स हेलिकॉप्टर क्रूसहीत आर्म्सफोर्सचे अन्य नऊ लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यात स्क्वॉन्ड्रन लिडर कुलदीप सिंग, विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान, अरकल प्रदीप, राणा प्रताप दास, हरविंदर सतपाल राय, नायक जितेंद्र कुमार, नायक गुरुसेवक सिंग, लान्स नायक विवेक कुमार, बी साई तेजा आदींचा समावेश होता, अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा:
३७० हटवल्यावर काश्मीरमधून हिंदू पळाले का? किती अतिरेकी मारले गेले?
भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली
पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार
या घटनेची माहिती मिळताच एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरींना घटना स्थळी पाठवण्यात आले होते. त्यांनी घटना स्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. काल वेलिंग्टनला जाऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.