डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योगपती बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा करताना मांडले मत

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बिल गेट्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत बिल गेट्स आणि नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांनी भारतासह जगाचं भविष्य, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, नोकऱ्या, औद्योगिक क्रांती, भारताची पुढील वाटचाल, डिजीटल क्षेत्रात भारताची कामगिरी, भारतासह जगभरातील देशांसमोरील आव्हानं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली.

एआय तंत्रज्ञानाबाबत बिल गेट्स यांनी विचारणा केली असता नरेंद्र मोदींनी एआयचं महत्त्व आणि त्यांचा स्वत:चा एआय तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन याविषयी भाष्य केलं. “एआयचे महत्त्व खूप आहे. आमच्या देशात मातेला अनेक राज्यांत आई म्हणतात. आमच्याकडे मूल जन्माला आल्यावर ते आईही म्हणतं आणि ए आईही म्हणतं,” अशी टिपण्णी नरेंद्र मोदी यांनी केली.

एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क असायला हवा

पुढे नरेंद्र मोदी असं म्हणाले की, “एआयने आपल्यासमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. एआय ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु, उत्तम प्रशिक्षणाशिवाय अशी गोष्ट एखाद्याच्या हातात दिली तर त्या गोष्टीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. सुरुवातीच्या काळात तरी एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क असायला हवा. ही सामग्री एआयच्या माध्यमातून बनवली असल्याचं लोकांना कळायला हवं. जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही.

डीपफेक हे एआयमुळे निर्माण झालेलं मोठं आव्हान

“डीपफेक हे एआयमुळे निर्माण झालेलं एक मोठं आव्हान आहे. भारतासारख्या लोकशाही असलेल्या मोठ्या देशात डीपफेक सामग्री बनवली जातेय. माझे डीपफेक व्हिडीओदेखील मी पाहिले आहेत. कोणीतरी माझ्या आवाजात एखादी घाणेरडी गोष्ट बनवली आणि समाजमाध्यमांवर शेअर केली तर सुरुवातीला लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे देशभरात गदारोळ माजू शकेल. त्यामुळेचं डीपफेक कॉन्टेंटचा मूळ सोर्स लोकांना समजला पाहिजे. कदाचित या गोष्टीची भविष्यात गरज पडणार नाही. परंतु, सध्या तरी आपण काळजी घेतली पाहिजे,” असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे.

नमो ऍपमध्ये फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर

तसेच पंतप्रधानांनी गेट्स यांना नमो ऍपवरील फोटो बूथ वापरुन सेल्फी घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. नमो ऍपनं अलीकडेच एक नवीन एआय पॉवर्ड फोटो बूथ वैशिष्ट्य सादर केलं. त्यामुळे वापरकर्त्यांना फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करुन पंतप्रधानांसोबतचे फोटो शोधून मिळतात. भारतात एआय तंत्रज्ञानाला पाठींबा आणि प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अलीकडेच १० हजार ३७१.९१ कोटी रुपयांच्या बजेटसह सर्वसमावेशक राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया AI’ मिशनला मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक

गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले. तंत्रज्ञान लोकांसाठी आहे त्यात कोणाची मक्तेदारी नाही. २ लाख आरोग्य मंदिरे बांधली. आरोग्य क्षेत्र आणि रुग्णालये तंत्रज्ञानाशी जोडली. ३ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्रत्येक मुलाला, प्रत्येक गावात डिजिटल शिक्षण देणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. डिजिटल पायाभूत सुविधा खेड्यापाड्यात घेऊन जाणार असा आमचा निर्धार आहे.” बिल गेट्स यांच्याशी बोलताना नरेंद्र मोदींनी नमो ड्रोन दीदीचाही उल्लेख केला. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात महिला अधिक पुढाकार घेत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘नमो ड्रोन दीदी योजना’ यशस्वी होत असून यातील स्त्रिया अत्यंत आनंदी आहेत.

Exit mobile version