इलेक्ट्रिसिटी केबिनची आग इमारतीत पसरणार होती, पण दीपक देवदूत बनला!

प्रभादेवीच्या कपिला बिल्डिंगला लागलेली आग मोठ्या साहसाने विझवली

इलेक्ट्रिसिटी केबिनची आग इमारतीत पसरणार होती, पण दीपक देवदूत बनला!

तारीख १६ जून २०२३, वेळ होती सकाळी ६. प्रभादेवीच्या खेडगल्ली येथील कपिला बिल्डिंगच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिसिटी केबीन आगीने वेढली. ही आग पसरून मोठी दुर्घटना घडणार होती. आज काहीतरी विपरीत होणार असे चित्र दिसत असतानाच बिल्डिंगचा रहिवासी दीपक निगडे देवदूतासारखा धावून आला.

कपिला बिल्डिंगचे सेक्रेटरी संतोष झेंडे कामानिमित्त बाहेर गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांना केबिनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. क्षणाचा विलंब न करता त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून कळवले. संतोष झेंडे यांनी बिल्डिंगच्या कमिटी मेंबरना फोन करून खाली येण्यास सांगितले आणि रहिवाशांना तात्काळ कळवा अशा सूचना दिल्या. त्यातच केबिनमध्ये फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते. त्यातच संतोष झेंडे यांचे बोलणे दीपक निगडे यांच्या कानी आले. काहीतरी विपरीत घडले आहे, याचा आता अंदाज दीपक यांना आला.

दीपक यांनी आजूबाजूच्या गाढ झोपेत असलेल्या शेजाऱ्यांना कळवले आणि इतरांनाही कळवा अशा सूचना देऊन ते जिन्या मार्गाने खाली आले. खाली येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. केबिनमध्ये आग लागली असल्या कारणाने रेतीची गरज होती. त्यांनी बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साइटमधून रेती आणली. त्यांना गुरुचरण बिंगी आणि इतर रहिवाशीनी साथ दिली. रेती आणून त्यांनी ती जमिनीवर ओतून हाताने आगीवर टाकली आणि आग रौद्ररूप धारण करणार असे वाटत असतानाच त्यांनी आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या गाड्या क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी पोहोचल्या. परंतु ही आग ते येण्याआधीच विझवली. दीपक यांनी दाखवलेल्या या धाडसाचे स्थानिक रहिवाशांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा :

मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित कॅनडातून ताब्यात

कुपवाडामध्ये पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

आशिया कपमध्ये बुमराह, श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता

चक्रीवादळ व्यवस्थापनात ओदिशा ठरलेय ‘रोल मॉडेल’

दीपक यांना या धाडसाविषयी विचारल्यानंतर, त्यांनी आपण एका मोठ्या दुर्घटनेपासून बचावलो याचा मला आनंद आहे. ही आग पसरून एक मोठी दुर्घटना घडली असती. आग विझवण्यासाठी मी आणि इतर रहिवाशांनी प्रयत्न केले आणि सफलही झालो. कपिला इमारतीतील रहिवाशी हे एक कुटुंब आहे. आपण एकमेकाला सहाय्य केलं, तरच अशी दुर्घटना आपण टाळू शकतो. आज माझ्यामुळे एक मोठी दुर्घटना होण्यासापासून टळली, अनेकांचे जीव वाचले. माझ्या हातून एक चांगले काम घडले, याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version