पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या ३५ प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर येथील विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले. दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते कृषी विद्यापीठांना हरित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शेतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी काही अभिनव प्रयोग केले आहेत, अशा शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
बाजरी, चणे, क्विनोआ, कुटूपीठ, चवळी, मसूर आदिंच्या विशेष गुणधर्म असलेल्या पिकांचे हे वाण आहे.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या ६-७ वर्षात शेतीशी निगडित समस्या सोडविण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्राधान्याने वापर झाला आहे. ‘बदलत्या हवामानाशी, नव्या परिस्थितीशी जुळवून घेणारे उच्च पोषण बियाणे विकसित करण्यावर आमचा भर आहे,’ असे पंतप्रधानांनी सांगितले.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?
डोंबिवलीमधील बलात्कारातील सर्व ३३ आरोपी गजाआड
शिवसेना आमदार आशिष जयस्वालांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा
हवामान बदल आणि कुपोषणाच्या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने पिकांच्या विशेष जाती विकसित केल्या आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. २०२१ मध्ये अशा ३५ जाती विकसित केल्या आहेत. पंतप्रधानांनी गेल्या वर्षी विविध राज्यांमध्ये कोरोना महामारी दरम्यान झालेल्या टोळधाडीच्या हल्ल्याची आठवण करुन दिली. भारताने बरेच प्रयत्न करून या हल्ल्याचा सामना केला, मोठ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना वाचवले, असेही ते म्हणाले.
जमिनीच्या संरक्षणासाठी ११ कोटी मृदा आरोग्य कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकर्यांना पाण्याची सुरक्षा देण्यासाठी सुमारे १०० प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियान, शेतकऱ्यांना पिकांवरील रोगांपासून संरक्षण देण्यासाठी तसेच अधिक उत्पन्न मिळावे यासाठी नवीन प्रकारची बियाणे उपलब्ध करून देणे याचा शेतकरी स्नेही उपक्रमांमध्ये समावेश आहे.