जगातील सर्वांत उंच असे एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर झाल्याचा विजयोत्सव संपूर्ण जग आज साजरे करत आहे. एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांनी २९ मे १९५३ रोजी पहिल्यांदा माऊंट एव्हरेस्ट सर केले होते. मात्र एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि गिर्यारोहक बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्टवर चढाई करताना होणाऱ्या वाढत्या मृत्यूला श्रीमंत गिर्यारोहक जबाबदार असल्याची टीका केली आहे.
‘जगातील सर्वात उंच पर्वतावर गर्दी होत आहे. श्रीमंत गिर्यारोहकांकडे सपोर्ट सिस्टीम विकत घेण्यासाठी पैसे आहेत, परंतु त्यांचा हेतू योग्य नाही. तसेच, योग्य प्रशिक्षण आणि अनुभवाच्या अभावामुळे एव्हरेस्टवरील मृत्यू वाढत आहेत,’ असे पाल म्हणाल्या. अशा घटना रोखण्यासाठी परवानग्यांचे नियमन करण्याचा पर्याय त्या सुचवतात. “जेव्हा मी पहिल्यांदा (१९८४ मध्ये) शिखर सर केले तेव्हा एका मोसमात मर्यादित मोहिमांना एव्हरेस्टवर चढाई करण्याची परवानगी होती. हे फक्त अनुभवी आणि प्रशिक्षित लोकच करू शकतात. परंतु आता ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्याला एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे चढाई करण्याची परवानगी आहे, अशी टीका त्यांनी केली.
एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी परमिट शुल्कासह एकूण खर्च ४० हजार ते ५० हजार डॉलर (सध्याच्या दरानुसार ३३ ते ४० लाख रुपये) आहे. ‘माऊंट एव्हरेस्ट चढण्याला आता व्यावसायिक रूप आले आहे. नेपाळला एव्हरेस्टच्या गिर्यारोहण शुल्कातून दरवर्षी अंदाजे पाच दशलक्ष डॉलर मिळतात. १९९३मध्ये माउंट एव्हरेस्टवर १८ सदस्यांच्या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या पाल सांगतात. “पूर्वी एव्हरेस्ट चढाईत प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर भर अधिक होता.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील शूरवीरांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराने गौरविणार
मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…
शिक्षणविरोधी तालिबानच्या नाकावर टिच्चून ती झाली आयआयटी पदवीधर
‘चालण्यासाठी वापरली जाणारी काठी म्हणून सेंगोलचा वापर झाला होता’!
आता, दरवर्षी ६००हून अधिक व्यक्ती एव्हरेस्टवर चढाई करत आहेत आणि हे वेडेपणाचे आहे. अशीच चिंता एव्हरेस्टवर सातवेळा चढाई करणारे लवराज सिंह धर्मशक्तू यांनीही व्यक्त केली होती. “एव्हरेस्ट चढण्याची संपूर्ण प्रक्रिया किंवा त्या दृष्टीने नेपाळमधील इतर कोणत्याही शिखराचे पूर्णपणे व्यावसायिकीकरण झाले आहे. ज्यामुळे गिर्यारोहणाचा मूलभूत पायाच हिरावला गेला आहे.
” धर्मशक्तू यांनी या संदर्भातील एक किस्साही सांगितला. “एकदा पायथ्याशी हौशी लोकांना पाहून मला धक्का बसला. चढाईच्या तीन-चार दिवस आधी क्लाइंबिंग बूट कसे घालायचे हे ते या शिबिरात शिकत होते. आजकाल काहीजण नेपाळमध्ये एका महिन्याच्या कालावधीत सहा-सात शिखरे सर करत आहेत. मला आठवतं, १९९० च्या दशकात एव्हरेस्ट चढायला दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागायचा,’ असे ते म्हणाले.