भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली असून देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडीला वाहनायोग्य रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेला घरातच प्रसुती करण्याची वेळ आली. सदर महिलेने घरातच दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र जन्मानंतर उपचाराअभावी ह्या बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. त्याच दरम्यान मातेची प्रकृती खालावल्याने तिला तीन किलोमीटर डोंगर कपारीतून मुख्य रस्त्यावर आणले आणि तेथून खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले असून, सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
मर्कटवाडी येथील वंदना यशवंत बुधर ही महिला सात महिन्याची गरोदर असताना तिला प्रसूती कळा यायला सुरुवात झाली. कुटूंबियांनी तात्काळ ‘आशा सेविकेला’ संपर्क केला. सेविकाही महिलेच्या घरी तात्काळ पोहोचल्या त्यांनी १०८ नंबर वर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली, मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी पर्यंत रास्ता नसल्याने रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू शकली नाही. महिलेला जास्त प्रमाणात वेदना होत होत्या. त्यातच तिची प्रसूती घरातच झाली. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महिलेला झोळीत घालून रुग्णवाहीकेपर्यंत नेण्यात आले. तसेच सातव्या महिन्यामध्ये जन्मलेल्या बालकांची अवस्था कमकुवत असल्याने त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक होते. मात्र मदत न मिळाल्याने दोन बालकांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली
मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव
निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!
भूकंपाच्या तीन धक्क्यांनी नाशिक हादरले
या गावात या पूर्वीही अशा प्रकारे वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेक रुग्णांना रस्त्यातच जीव गमवावा लागला आहे. तसेच गावात अंगणवाडी असून, ५ वी पर्यत शाळा आहे. १४०० लोकसंख्या असलेल्या मर्कटवाडीत आदिवासी समाजाला मरण यातना भोगावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. २ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित जिल्हाधीकारी गोविंद बोडके यांनी या गावाची पाहणी केली असता, ताबडतोब रस्त्ये बांधण्याचे आदेश दिले. मात्र बांधकाम विभागाच्या दिरंगाईने अजूनही रस्तेबांधणीची सुरुवात झाली नाहीये. अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी दिली.