कोरोनामुळे भाजपाच्या डहाणू मतदार संघातील माजी आमदार पास्कल धनारे यांचे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र पहाटे त्यांचे निधन झाले.
डहाणू मतदारसंघात प्रथम २०१४ मध्ये पास्कल धनारे हे भाजपाकडून जिंकून आले होते. या मतदार संघातून जिंकून येणारे ते भाजपाचे पहिले आमदार होते. भाजपाने २०१९ च्या निवडणुकीतही त्यांना उमेदवारी दिली होती, परंतु तेव्हा त्यांचा पराभव झाला होता.
हे ही वाचा:
कोवीड लसीच्या साठेबाजी प्रकरणी राजेश टोपेंना नोटीस
६३,२९४ नव्या रुग्णांसह महाराष्ट्राने नोंदवला रुग्णवाढीचा नवा उच्चांक
काही दिवसांपूर्वी धनारे यांना कोरोना झाला होता. त्यांना उपचारार्थ वापी येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. तेव्हापासून त्यांची मृत्युशी झुंज चालू होती, मात्र ती अपयशी ठरली. आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्यात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनामुळे अनेक सेलिब्रेटी आणि राजकिय नेते यांना देखील लागण झाली आहे. काहींनी आपला जीवही यात गमावला आहे. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे, भाजपाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा समावेश आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण टाळेबंदीची शक्यता वर्तवली जात आहे.