आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे कालवश

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे कालवश

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ८१ वर्षांचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वीणा, मुलगा सुनिल, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.

हे ही वाचा:

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

१ कोटी महिलांना मिळणार लाभ; पंतप्रधानांनी केली घोषणा

काय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?

‘त्या पाच वर्तुळांचे दडपण नेहमीच असते’

बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच, त्यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादीत न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले.

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केले होते. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. आरोग्य विषयक घडामोडींवर अत्यंत जागरुकपणे त्यांनी अनेक काळ काम केले. केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्या निमित्ताने राजकीय, अभिनेते, संगीत, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून कार्ला येथे येत होते.

Exit mobile version