भारताने टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं. या स्पर्धेत जसे संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे होते तसेच संघाचा प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळत असणाऱ्या राहुल द्रविड याचीही मेहनत आणि योगदान अमुल्य होते. राहुल द्रविड २०२१ साली भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला आणि त्याच्या प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली संघाने २०२२ मध्ये टी- २० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, २०२३ विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आणि २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अखेर २०२४ मध्ये त्याच्या शेवटच्या कार्यकाळातील शेवटच्या स्पर्धेत संघाला विश्वविजेते बनवण्यात द्रविडला यश आले. अशातच द्रविडसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
रोहित शर्माने त्याच्या पोस्टमध्ये राहुल द्रविडबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “प्रिय राहुल भाई, मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत होतो, पण मला खात्री नाहीये की मला ते कधी सापडतील, त्यामुळे हा माझा प्रयत्न. कोट्यावधी लोकांप्रमाणेच मी देखील लहानपणापासून तुझ्याकडे आदर्श म्हणून पाहात आलो आहे पण मी नशीबवान होतो की मला तुझ्याबरोबर इतक्या जवळून काम करण्याची संधी मिळाली. तू या खेळातील एक दिग्गज आहेस, पण तरीही तू तुझं कौतुक आणि यश दारातच ठेवून आमचा प्रशिक्षक म्हणून आत आलास. तुझ्याशी काहीही बोलताना आम्हाला सर्वांना कधीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली. सर्व गोष्टींनंतरही तूझी माणूसकी आणि तुझे खेळाप्रती असलेलं प्रेम हिच तूझी भेट आहे. मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे आणि मी या प्रत्येक आठवणी आनंदाने जपेल. माझी पत्नी तुला माझी ‘वर्क वाईफ’ म्हणते. मी नशीबवान आहे की मीही तुला तसंच म्हणतो. ही एकच गोष्ट होती, ज्याची कमी तुझ्याकडे होती, त्यामुळे मी आनंदी आहे की आपण हे एकत्र मिळून जिंकू शकलो. राहुल भाई, तुला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणायला मिळणे हा सन्मान आहे.”
हे ही वाचा:
वसंत मोरेंची आता नवी पसंत..उबाठा गटात प्रवेश !
वरळी हिट अँड रन प्रकरण, जुहूतील ग्लोबल तपस बार सील!
मॉस्कोतून नरेंद्र मोदी म्हणाले, भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणार!
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
रोहित शर्मा याने भावनिक पोस्ट करत राहुल द्रविड याचे टी- २० विश्वचषक स्पर्धेतील आणि यापूर्वीच्या त्याच्या प्रशिक्षक म्हणूनच्या कारकिर्दीतील योगदान अधोरेखित केले आहे. राहुल द्रविड याने १९९६ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते आणि २०१२ पर्यंत देशाचे प्रतिनिधित्व करत राहिला. इतर सर्वांप्रमाणे द्रविड याचेही विश्वविजेते बनण्याचे स्वप्न होते. अखेर, प्रशिक्षक म्हणून तो हे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरला.