हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर

हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर

दंगल चित्रपटात लहानपणीच्या बबिता कुमारी हिची भूमिका करणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे शनिवारी, वयाच्या १९व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. सुहानीच्या आई-वडिलांनी तिच्या निधनाचे कारण सविस्तरपणे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. एका विचित्र आजारामुळे सुहानीला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी सुहानीच्या हाताला सूज आली होती. सुरुवातीला तिला ही बाब सर्वसाधारण वाटली, मात्र त्यानंतर तिच्या दुसऱ्या हाताला आणि त्यानंतर संपूर्ण शरीराला सूज आली. अनेक डॉक्टरांकडे जाऊनही तिच्या आजाराचे निदान होऊ शकले नाही. ११ दिवसांपूर्वी सुहानीला एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले. तेव्हा चाचण्यांमध्ये तिला दुर्मिळ अशा डर्मेटोमायोसिटिस आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. या आजारावर केवळ स्टिरॉइड्स हाच उपाय आहे.

स्टिरॉइड्स घेतल्यानंतर तिच्या संपूर्ण रोगप्रतिकारक यंत्रणेला फटका बसला आणि तिची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो. सुहानीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने तिला रुग्णालयात संसर्ग झाला. तिची फुप्फुसे कमकुवत झाली. त्यात पाणी जमा झाले आणि तिला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुहानीची प्राणज्योत मालवली, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली.

हे ही वाचा:

पोखरणमध्ये ‘वायू शक्ती-२४’चा थरार!

कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…

संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!

‘सीता’ सिंहीण आणि ‘अकबर’सिंहाच्या एकत्र राहण्यास विरोध!

सुहानीच्या आईने आपल्या मुलीबद्दल अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सुहानी लहानपणापासून मॉडेलिंग करत असे. तिची सुमारे २५ हजार मुलांमधून दंगल चित्रपटासाठी निवड झाली होती. सध्या ती मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमच्या दुसऱ्या वर्षाला होती. तिला शिक्षण पूर्ण करून चित्रपटात कारकीर्द घडवायची होती. आमिर खान निर्मितीसंस्थेनेही सुहानीच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला आहे. तर, दंगल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सुहानीचा मृत्यू धक्कादायक आणि हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version