पुढील वर्षापासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा आणि गोविंदा मृत्युमुखी पडल्यास १० लाख

पुढील वर्षापासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा आणि गोविंदा मृत्युमुखी पडल्यास १० लाख

गेली काही वर्षे दहीहंडी तथा गोविंदा या उत्सवाला खेळाचा दर्जा मिळावा, गोविंदांना विमा कवच असावे, अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात या निर्णयांची माहिती दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, गोविंदांच्या बाबतीत दहीहंडीच्या दिवशी सुट्टी मिळावी, गोविंदांचा विमा करण्यात यावा अशी मागणी होती. अनेक गोविंदा यादरम्यान दुर्घटनाग्रस्त होतात, त्यांना मदत मिळावी व खेळ म्हणून या उत्सवाचा समावेश व्हावा, त्याला साहसी खेळात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी होती.

शिंदे म्हणाले की, दहीहंडीच्या दिवशी आपण सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी विम्याबाबत भूमिका मांडली आहे. गोविंदा उद्याच असल्यामुळे विम्याच्या प्रक्रियेला विलंब लागेल. त्यामुळे तूर्तास मदत दिली जाईल. अशा घटना घडू नयेत पण दहीहंडीदरम्यान एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर शासनाकडून १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. गोविंदा जबर जखमी झाला तर ७.५० लाख आणि त्याच्या अवयवाला गंभीर इजा झाली तर ५ लाख रुपये आपण देणार आहोत. त्याचबरोबर क्रीडा प्रकारात त्याचा समावेश करणार आहोत.

हे ही वाचा:

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक

‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’

‘मी ख्रिश्चन आहे, मी तिरंग्याला सलाम करणार नाही’

 

शिंदे यांनी सांगितले की, गोविंदांची मागणी होती की या उत्सवाचा साहसी खेळ म्हणून समावेश व्हावा. म्हणून या गोविंदा उत्सवाचा क्रीडाप्रकारात समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. या स्पर्धा प्रो गोविंदा स्पर्धा म्हणून राबवाव्यात. राज्य शासनाकडून त्यांचे आयोजन होईल. शासनाकडून बक्षिसे मिळतील. इतर खेळांप्रमाणे गोविंदांनाही सरकारी नोकरीत कोटा लागू होईल. इतर सुविधांचाही लाभा मिळेल. स्पेन वगैरे देशात पिरॅमिड म्हणून खेळाचा समावेश आहे. पारंपरिक खेळांप्रमाणे दहीहंडीला क्रीडाप्रकारात समाविष्ट करून पुढील वर्षी प्रो गोविंदा स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कवच पुढच्या वर्षी लागू होईल. यंदा मात्र तातडीने मदत दिली जाईल.

Exit mobile version