मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन आणि वारंवार सूचना देऊनही मुंबईच्या दादर परिसरातील भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करत असल्याने आता हे मार्केट स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील भाजी मार्केटस तात्पुरती खुल्या मैदानात हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कडक निर्बंध लादूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुंबईतील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याचे सांगितले. मुंबईतील ३५ लसीकरण केंद्रे सध्या बंद पडली आहेत. तसेच रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत विरोधक राजकारण करत आहेत. त्यांना खुर्चीत बसून नुसतं बोलायला काय जातं, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
हे ही वाचा:
नावात ‘ऑक्सिजन’ असल्याचा असाही फायदा
निलेश राणेंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजेत
शिंगणेंच्या खुलाशाने नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड
आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज
गेल्या काही दिवसांत वारंवार सांगूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये भाजी मार्केटमध्ये सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दी होते. गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. तशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून आता पालिकेकडून दादर मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.