युरो कप फुटबॉल स्पर्धेतून नेदरलँड्सचा संघ बाहेर पडला आहे. चेक रिपब्लिक संघाने अतिशय धक्कादायकरित्या नेदरलँड्स संघाचा पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. तर या विजयामुळे चेक रिपब्लिक संघाने उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
रविवार, २७ जून रोजी युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ चा तिसरा सामना पार पडला. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ९.३० वाजता हा सामना सुरु झाला. नेदरलँड्स आणि चेक रिपब्लिक या दोन संघात पार पडलेल्या या सामन्यात कागदावर बघताना नेदरलँड्सचा संघ हा चेक रिपब्लिकपेक्षा वरचढ वाटत होता. स्पर्धेतील एकूण कामगिरी बघताही तसेच वाटत होते. पण प्रत्यक्ष सामना सुरु झाल्यावर मात्र चेक रिपब्लिक संघाने जगभरातील फुटबॉल चाहत्यांना आणि नेदरलँड्स संघाला आश्चर्याचा धक्का दिला. हा इतका नेदरलँड्सला इतका जोरदार बसला की थेट त्यांना स्पर्धेच्या बाहेर फेकून गेला.
हे ही वाचा:
पुदुचेरीला मिळाली पहिली महिला मंत्री
‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले
पंतप्रधान मोदींनी घेतली तिरंदाज प्रवीण जाधवची दखल
सामन्याच्या सुरवातीपासूनच नेदरलँड्सपेक्षा चेक रिपब्लिकचा संघ हा जास्त आक्रमक होता. पण तरीही सामन्याच्या पहिल्या ४५ मिनिटांमध्ये कोणत्याच संघाला गोल करता आला नाही. पण सामन्याचा उत्तरार्ध सुरु झाला आणि नेदरलँड्स संघाची सारीच गणिते फिस्कटली. या ४५ मिनिटांमध्ये नेदरलँड्स संघासाठी काहीच धड झाले नाही. दुसरा हाफ सुरुझाल्यापासून अवघ्या १० मिनिटांत म्हणजेच सामन्याच्या ५५ व्या मिनिटाला नेदरलँड्सचा खेळाडू डी लिट याला रेड कार्ड दाखवत सामन्यातून बाहेर करण्यात आले. त्याने जाणीवपूर्वक बॉलला हात लावून तो अडवण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला टॉमस होल्स याने गोल करत चेक संघाला आघाडी मिळवून दिली. तर ८० व्या मिनिटाला पॅट्रिक श्चिक याने गोल करत चेक संघाची आघाडी २-० केली. हाच सामन्याचा अंतिम निकाल ठरला. या विजयासह चेक संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून त्यांचा सामना डेन्मार्क सोबत असणार आहे.