सीरमचे अध्यक्ष सायरस पुनावालांनी मिश्र लसींबाबत केले मोठे विधान

सीरमचे अध्यक्ष सायरस पुनावालांनी मिश्र लसींबाबत केले मोठे विधान

जग सध्या कोविड महामारीचा सामना करत आहे. त्यावर लस हा रामबाण उपाय म्हणून समोर आल्याने जगात मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र त्यातही भारतातील कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रमुख लसी असताना, या लसींची मिश्र मात्रा देण्याविषयी अभ्यास करण्यास डीसीजीआयने मान्यता दिली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी वेगळे मत व्यक्त केले आहे.

पुनावाला यांनी सांगितले की, आम्ही महिन्याला केवळ दहा कोटी लसींचं उत्पादन करू शकतो. जगात कोणतीही एक कंपनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीचं उत्पादन करू शकत नाही. त्याबरोबरच मिक्स डोस देण्यास माझा विरोध आहे, असे परखड मत देखील त्यांनी व्यक्त केले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सायरस पुनावाला यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यावेळी त्यांनी परखड आणि स्फोटक मते व्यक्त केली. आम्ही महिन्याला १० कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी १० ते १२ कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही. पण आम्ही ॲडव्हान्समध्ये प्रयत्न करून आणि हजारो कोटींची गुंतवणूक करून हे केलं आहे. त्या प्रमाणे तुम्हाला गणित करावे लागेल. त्याप्रमाणेच बाकीचे उत्पादक महिन्याला एक किंवा दोन कोटी लसी देतील, तर त्याप्रमाणे लसीकरण वाढेल, असं पुनावाला म्हणाले.

हे ही वाचा:

संसदेतील तमाशा, पवारांची घुसमट

टोकियोत ‘नेम’ का चुकला?

ट्विटरनंतर इन्स्टाग्रामचीही राहुल गांधींवर कारवाई

एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?

यावेळी त्यांनी कॉकटेल लस देण्यास विरोध केला. मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा लसीचा परिणाम चांगला निघाला नाही तर एकमेकांवर दोषारोप होईल. सीरम म्हणेल त्यांची लस चांगली नाही. तर समोरची कंपनी म्हणेल सीरमच्या लसीमुळे गडबड झाली. त्यामुळे एकमेकांवर आरोप होण्यापलिकडे दुसरं काही होणार नाही, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर देखील मत व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत स्फोटक विधाने देखील केली. त्यांनी शाळा सुरू करण्याबाबत देखील विधान केले. त्यावेळी त्यांनी घरीच अभ्यास करणेही शक्य असल्याचे म्हटले. त्याबरोबरच मृत्युदर खूप वाढला तर टाळेबंदी ठीक आहे. परंतु मृत्युदर कमी असताना मृत्युमुखी पडलेले काही लोक निष्काळजीपणामुळे देखील गेले असेही त्यांनी म्हटले आहे. आजाराचा प्रकोप वाढल्यानंतर ते रुग्णालयात आले. त्यामुळे उशिर झाला होता. दवाखान्यात तात्काळ येऊन उपचार घेतला तर मृत्यूचं प्रमाणही कमी होतं, असं त्यांनी सांगितलं. काही समाजाच्या लोकांनी तर सुरुवातीला उपचार नाकारले आणि लसही नाकारली असेही त्यांनी यावेळेस म्हटले.

Exit mobile version