सोमवारी रात्री मुंबईतील धारावी परिसर सिलेंडर स्फोटांनी हादरला. धारावीमधील सायन- धारावी लिंक रोडवर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सिलेंडर असलेल्या एका मोटार ट्रकला आग लागली. यामध्ये सिलेंडरचा विस्फोट होऊन आणखी सिलेंडरचे स्फोट झाले आणि आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकला आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक सिलिंडरचे अनेक स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवार, २४ मार्च रोजी धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निसर्ग उद्यानच्या बाजूला गॅस सिलिंडरने भरलेले वाहन उभे होते. साधारण ९.४५ ते १०.०० वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत गेले आणि आग लागली. स्फोटांचा आवाज अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला होता. यानंतर धारावीत दोन्ही बाजूंचा रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता आणि वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. आगीची माहिती मिळाल्याबरोबर पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. अग्निशामक दलाची वाहनेही घटनास्थळी आली. अग्निशमक दलाच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. आजूबाजूच्या साधारणपणे चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा :
कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक!
नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!
कुणाल कामराच्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाईचा बडगा
आग लागलेल्या मोटर वाहन चालकाची ओळख पटली असून सदर चालकाला ताब्यात घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ही आग अग्निशमन दलाच्या एकूण १९ गाड्यांनी आटोक्यात आणली. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-२ ची असल्याची माहिती दिली आहे. घटनास्थळावर पोलीस स्टेशन धारावी माहीम शाहूनगर कुर्ला विनोबा भावे नगर या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सहायक पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्त परिमंडळ पाच त्यांच्या स्टाफ सहित हजर होते. सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे.