गुजरातच्या काही जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून पूरस्थिती निर्माण झाली होती. अशातच आता गुजरात किनारपट्टी भागाला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शनिवारी पुन्हा एकदा गुजरातला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘असना’ नावाच्या चक्रीवादळात झाले. हे वादळ अरबी समुद्रातून आले असले तरी भारतीय किनारपट्टीपासून लांब आहे. मात्र, याचा केंद्रबिंदू गुजरातच्या किनारपट्टीवर आहे. त्यामुळे कच्छ किनारपट्टीला सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
गुजरात आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर एकाच वेळी कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मान्सून वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. गुजरात किनारपट्टीवर २४ तासांपासून कमी दाबाचा पट्टा कायम असून शुक्रवारी दुपारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. त्यामुळे त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. हे वादळ शनिवारी दिवसभर या किनारपट्टीच्या जवळपास राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याचा परिणाम १ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. हे वादळ १ सप्टेंबर रोजी गुजरात किनारपट्टीकडून ओमान देशाकडे जाईल, असा अंदाज आहे. या वादळाला पाकिस्तानने ‘असना’ हे नाव दिले आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
३० ऑगस्ट रोजी दुपारी चक्रीवादळ तयार झाले. सायंकाळी ७ नंतर वादळाचा वेग ताशी ५० ते ५५ कि.मी. होता. ३१ ऑगस्ट सकाळी ताशी ७० ते ७५ कि. मी. वेग वाढणार. ३१ ऑगस्ट दुपार ते रात्रीपर्यंत वादळाचा वेग ताशी ८० ते ८५ कि.मी. होईल. तर, १ सप्टेंबर सकाळी वेग कमी होत ताशी ५० ये ५५ कि.मी. वर येईल आणि वादळ ओमानच्या दिशेने जाईल.
हे ही वाचा :
पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई
आसाम विधानसभेत दोन तासांचा नमाज पठणाचा ब्रेक रद्द !
काँग्रेसवाल्यांना छत्रपतींची आठवण आली हेही नसे थोडके…
नेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!
अरबी समुद्रात ऑगस्ट महिन्यात खूप कमी चक्रीवादळे तयार झाली आहेत. १८९१ ते २०२३ या १३२ वर्षांच्या कालावधीत अरबी समुद्रात फक्त तीन चक्रीवादळे तयार झाली आहेत. १९४४, १९६४ आणि १९७६ मध्ये चक्रीवादळ तयार झाले होते. त्यानंतर थेट २०२४ मध्ये हे चक्रीवादळ तयार झाले आहे. तर, बंगालच्या उपसागरात ऑगस्ट महिन्यात २८ चक्रीवादळे तयार झाली आहेत.