तौक्ते या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसतोच आहे. पण कोकणात सर्वाधिक नुकसान या वादळाने केले आहे. विशेषतः गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग वादळातून झालेले नुकसान भरून निघालेले नसताना या दुसऱ्या वादळाचा तडाखा कोकणाला बसला आहे. देवगड तालुक्यात तर काही बोटी वाहून गेल्या आणि एका खलाशाचा त्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
तेथील वार्ताहर दया मांगले यांनी सांगितले की, आज वादळाचा वेग कमी आहे. पाऊस मात्र खूप होता. ५-६ मच्छिमार नौकांना या वादळाचा फटका बसला. त्यात २-३ बोटींना जलसमाधी मिळाली आहे. काही बोटी खडकांत अडकल्या आहेत. वादळाचा वेगच एवढा मोठा होता की, नांगरून ठेवलेल्या बोटी वाहून गेल्या. त्यात एका खलाशाचा मृत्यूही झाला आहे. तीन खलाशी बेपत्ता आहेत. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास नांगरून ठेवलेली रुक्मिणी ही बोट वाहून चालली होती, तिला वाचविण्यासाठी निघालेली दुसरी बोटही खडकावर आदळली आणि दोन्ही बोटीतील खलाशी पाण्यात पडले. सात खलाशी होते, त्यापैकी तीन बचावले. ते सुखरूप आहेत. तर चार वाहून गेले त्यातील एकाचा मृतदेह सोमवारी सापडला. तिघे अजून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा:
केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनी उघडले
हिंदुंच्या मिरवणुका, उत्सवाला विरोध करणाऱ्या मुस्लिमांवर मद्रास हायकोर्टाचे ताशेरे
तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली
टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच
आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान
देवगड तालुक्यात वीज पूर्ण पणे बंद आहे. विजेचे ६०-७० खांब पडले आहेत. झाडंही उन्मळून पडली आहेत. रत्नागिरी, महाडमधील एमएसईबीची पथके इथे रवाना करण्यात आली आहेत, ते या परिस्थितीची पाहणी करत आहेत. ग्रामीण भागात मात्र माड, आंबे यांचे मोठे नुकसान झाले आहे
या तौक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचेही खूप नुकसान झाले आहे. आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. कर्ज काढून या बागा उभ्या केल्या होत्या. त्यांचे मोठे नुकसान वादळामुळे झाले आहे. आंब्याचा हंगाम सुरू असताना लागलेले आंबे पूर्णपणे उध्वस्त झाल्यामुळे बागायतदारांपुढील चिंता वाढली आहे. आता हे नुकसान भरून मिळणार की नाही, याच्या नव्या चिंतेची भर त्यात पडली आहे.